

राजापूर : पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद हा जगातून समुळ नष्ट केला पाहिजे या भावनेने जगाचे नेतृत्व करत आहेत. येणार्या काळामध्ये पक्षसंघटना अधिक मजबुत करताना राष्ट्रहिताच्या विचाराने प्रेरित असणार्या आणि विकासाला प्राधान्य देणार्या अशा प्रत्येकाला आपल्या विचारधारेशी जोडण्याचे काम प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने केले पाहिजे असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांनी राजापूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना केले.
ते पुढे बोलताना म्हणाले, भारत आज विकासाकडे झेपावत असताना देशाची अर्थव्यवस्था जगात उच्च स्थानावर नेण्यासाठी पंतप्रधान मोदी करत असताना समाजाला त्या दिशेने नेण्याचे काम आपण सार्यांनी मिळून केले पाहिजे. पहेलगाम हल्यानंतर आपण देशात तिरंगा रॅली काढून भारतीय सैन्याला पाठिंबा देवून जगाला आपली एकी दाखवून दिलेली आहे. सामान्य जनतेलाही या विकास पर्वासोबत घेवून जाण्याची जबाबदारी कार्यकर्त्याची असून ती आपण पार पाडली पाहिजे असे आवाहन चव्हाण यांनी केले.