

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता ठासून भरलेली आहे, हे रत्नागिरीच्या अथर्व नागवेकर यांनी राष्ट्रीय स्तरावर सिद्ध केले आहे. देशातील सुमारे १ लाख ३७ हजार विद्यार्थ्यांकडून आयटीआयच्या संगणक ऑपरेटर ट्रेडमध्ये अथर्वने ६०० पैकी ६०० गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्याचे हे यश जिल्ह्यासह महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे, अशा शब्दांत पालकमंत्री उदय सामंत यांनी त्याचे कौतुक केले.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या संगणक प्रशिक्षणासाठी ४० संगणकांची सुसज्ज लॅब उभारण्याकरिता जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्याची घोषणाही मंत्री सामंत यांनी केली. शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ता बोलत होते.
यावेळी राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या श्रावणी चव्हाण यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. अथर्व नागवेकर याने मिळवलेले यश ऐतिहासिक असून, अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी दिली.
ग्रामीण भागातील शाळेत शिक्षण घेतले म्हणून कोणताही न्यूनगंड बाळगू नका. जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जागतिक स्तरावरही आपली क्षमता सिद्ध करता येते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. मराठी उद्योजकांनी जागतिक स्तरावर निर्माण केलेल्या यशस्वी वाटचालीची उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची प्रेरणा निर्माण केली.
आयटीआय प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रयोगशाळेची आवश्यकता मांडली. त्यावर तातडीने प्रतिसाद देत पालकमंत्र्यांनी ४० संगणकांची सुसज्ज लॅब उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आवश्यक तरतूद करण्याची घोषणा केली.
संस्थेने येत्या दोन दिवसांत प्रस्ताव सादर करावा, निधी मंजूर करण्याची कार्यवाही तातडीने केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांशी संबंधित विकासकामांचे प्रस्तावाही विलंब न करता सादर करण्याचे निर्देश मंत्री सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यशराणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या श्रावणी चव्हाण यांचीही यावेळी विशेष गौरव करण्यात आला. शिक्षणासाठी वयाची मर्यादा न ठेवता संस्थेने संधी दिल्याने स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभे राहण्याचे स्वप्न पूर्ण करता आले, अशी भावना श्रावणी चव्हाण यांनी व्यक्त केली. पती सचिन चव्हाण यांची साथ व मार्गदर्शन मीनल दळी यांचे सहकार्य या यशामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
अथर्व नागवेकर यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक, मार्गदर्शक व कुटुंबीयांना दिले. शिक्षकांनी नियमित सराव, परीक्षा व वेळेचे नियोजन यावर दिलेला भर यामुळे परीक्षेत सर्वोत्तम कामगिरी करता आल्याचे त्याने सांगितले. लोकमान्य टिळक आणि राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी दोन्ही संस्थांचे प्राचार्य ए. एस. देसाई व एस. जे. कोतवडेकर आदी उपस्थित होते.