Ratnagiri News| ई-केवायसीत राजापूर 'झीरो'; मंडणगड अव्वल!

जिल्ह्यात अद्याप १ हजार ६४४ शिक्षक-कर्मचाऱ्यांची केवायसी प्रलंबित
Ratnagiri Zilla Parishad
Ratnagiri Zilla Parishad
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : रत्‍नागिरी जिल्‍हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्‍या शिक्षक व केंद्रप्रमुखांच्‍या ई-केवायसी प्रक्रियेत राजापूर तालुका पिछाडीवर पडला असून, सप्‍टेंबरअखेरपर्यंत राजापूर तालुक्‍यातील एकाही शिक्षक किंवा शिक्षक केंद्रप्रमुखाची ई-केवायसी फॉरवर्ड झालेली नाही. त्‍यामुळे तालुक्‍याची ई-केवायसी पूर्णत्‍वाची टक्‍केवारी शून्‍य टक्‍के आहे. अद्याप १ हजार ६४४ शिक्षकांची ई-केवायसी प्रलंबित आहे. तर जिल्ह्याची सरासरी केवळ ६८.९८ टक्क्यांवर अडकली आहे. मंडणगड तालुक्‍याने आघाडी घेतली असून ९३.५८ टक्‍के काम झाले आहे.

रत्‍नागिरी जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षण विभागाच्‍या वतीने तालुकाप्रमुख, शाळेतील मुख्याध्यापकांना पत्र पाठवून ई-केवायसी पूर्ण करण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत; मात्र आता प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात एकूण ५ हजार ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात ५ हजार ६३ प्राथमिक शिक्षक आणि २३७ केंद्रप्रमुख आहेत. यापैकी ४ हजार १६१ कर्मचाऱ्यांनी आपले प्रस्ताव फॉरवर्ड केले आहेत. त्यापैकी ३ हजार ६५६ प्रस्तावांना मंजुरी (अप्रूव्ह) मिळाली असून १७० प्रस्ताव रिजेक्ट झाले आहेत. तर ३३५ प्रस्ताव अद्याप तपासणी स्तरावर अडकून पडले आहेत.

सर्वात चिंतेची बाब म्हणजे १,१३९ कर्मचाऱ्यांनी अद्याप आपले प्रस्ताव फॉरवर्डच केलेले नाहीत. त्यामुळे एकूण १ हजार ६४४ जणांची ई-केवायसी शिल्‍लक आहे. राजापूर तालुक्याची स्थिती सर्वात दयनीय आहे. राजापूरमधील ६३५ प्राथमिक शिक्षक आणि ३२ केंद्रप्रमुख अशा एकूण ६६७ जणांपैकी एकानेही ई-केवायसीसाठी प्रस्ताव फॉरवर्ड केलेला नाही. त्यामुळे राजापूरची टक्केवारी शून्य टक्के नोंदवली गेली आहे.

त्याचप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातील ३५ केंद्रप्रमुखांपैकी एकाही केंद्रप्रमुखाने आपले ई-केवायसी फॉरवर्ड केलेले नाही. केंद्रप्रमुखांनीच नियम पाळला नाही, तर शिक्षकांकडून काय अपेक्षा करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. ज्‍या शिक्षक, केंद्रप्रमुखांची ई-केवायसी प्रलंबित आहे, अशा शिक्षकांचा ऑक्‍टोबर, नोव्‍हेंबर पगार होणार नसल्‍याचे सांगण्यात आले. दरम्‍यान, शासनाच्‍या वतीने ई-केवायसीला मुदतवाढ मिळणार की शिक्षकांचा पगार थांबवणार, हे लवकरच कळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news