

रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी निवडणूक विभाग व निर्वाचन गणांची अंतिम आरक्षण अधिसूचना 3 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद, सर्व तहसीलदार कार्यालये आणि सर्व पंचायत समिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर व जिल्हाधिकारी यांच्या या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे प्र. उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या 1 ऑक्टोबर 2025 च्या आदेशानुसार सदर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत एकूण 56 गट असून, त्यातील 28 गट हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. अनुसूचित जातीसाठी दोन गट असून, एक गट महिलांसाठी, अनुसूचित जमातीसाठी एक गट आरक्षित असून तो महिलांसाठी आरक्षित झाला आहे. ओबीसींसाठी 15 गट असून त्यातील 8 गट महिलांसाठी, तर सर्वसाधारण 38 गट असून त्यातील 18 गट हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर या नऊ पंचायत समित्या असून, त्यासाठी 112 गण आहेत. यासर्व गट व गणांचे अंतिम आरक्षण अधिसूचना जारी झाली आहे. त्यामुळे लवकरच जि.प. व पं.स. निवडणुकांचे फटाके फुटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.