

रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण शुक्रवारी जाहीर झाले आहे. रत्नागिरी जि. प. अध्यक्षपदाच्या खुर्चीत नागरीकांचा मागासप्रवर्ग (ओ. बी. सी.) महिला बसणार आहे. एकंदरित अध्यक्ष पद डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागलेल्या अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.
‘मिनी मंत्रालय ’ अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. यासाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. अध्यक्ष पदाची आरक्षणाची मोठी चर्चा सुरु होती. दरम्यान, शुक्रवारी राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. ग्रामविकास विभागाने याबाबतचची आधी सूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला (ओ. बी. सी. महिला) असे आरक्षण पडले आहे. महिला आरक्षण पडल्याने अनेक इच्छुकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. काहीजणतर अध्यक्ष पद डोळ्यासमोर ठेऊन गणेशोत्सवात तयारीला लागलेले पहायला मिळाले. परंतु आता त्यांना एकतर गप्प घरी बसावे लागेल अथवा सौं. ना निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागेल. सध्या मात्र अनेकांनी इच्छुकांची यादी बनवायला सुरवात सुद्धा केली. यामध्ये नेत्रा ठाकुर, देवयानी झापड;कर, मुग्धा जागुष्टे यांचा समावेश आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात नऊ पंचायत समित्या असून यात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एक, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी महिला राखीव एक, सर्वसाधार प्रवर्गासाठी सभापतीपदांची संख्या तीन तर सर्वसाधारण प्रवर्गात महिलांसाठी राखीव झालेल्या सभापतीपदांची संख्या चार आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण पाच सभापतींच्या जागांवर महिलांचे राज्य असणार आहे.