

रत्नागिरी : महानगरपालिका निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने ग्रामीण भागात पुन्हा निवडणुकीचा रंग चढू लागला आहे. जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची एकत्रित कामगिरी चांगली झाल्याने जि.प. व पं.स.साठी दोन्ही पक्षांनी युती करुन लढण्याचे निश्चित केले आहे. मकर संक्रांतीच्या मुहुर्तावर राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पालीतील निवासस्थानी झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तीळगूळ वाटून तोंड गोड करीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
ना. उदय सामंत महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर थेट बुधवारी पाली येथील निवासस्थानी हेलिकॉप्टरने दाखल झाले. त्यानंतर याठिकाणी शिवसेना व भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. नगरपालिका निवडणुकीत जिल्ह्यामध्ये शिवसेना-भाजप युतीला मोठे यश मिळाले आहे. सातपैकी सहा ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. युतीचे गणित जुळल्यामुळे जि.प. व पं.स. निवडणुकीतही याच पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाण्यावर चर्चा करण्यात आली. जागा वाटपाबाबत आणखी एकदा बैठक होणार असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
शिवसेनेतर्फे पालकमंत्री उदय सामंत, राजापूर-लांजाचे आमदार किरण ऊर्फ भैया सामंत, चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, रत्नागिरी तालुकाध्यक्ष बाबू म्हाप, चिपळूणचे राकेश शिंदे यांच्यासह शिवसेनेचे कोअर कमिटीमधील पदाधिकारी, तर भाजपकडून निवडणूक जिल्हा प्रभारी ॲड. दीपक पटवर्धन, माजी आमदार डॉ. विनय नातू, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहायक अनिकेत पटवर्धन व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.