

रत्नागिरी : तालुक्यामध्ये दहा जिल्हा परिषद व वीस पंचायत समिती गण येत असून महिला मतदारांची संख्या सर्वाधिक असून एकूण 2 लाख 4 हजार 496 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शुक्रवारी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसला तरी 14 जणांनी 30 नामनिर्देशन पत्र घेऊन गेले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये मंडणगड, दापोली, गुहागर, दापोली, चिपळूण, संगमेश्वर, लांजासह राजापूरमध्येही पहिल्या दिवशी कुणीही अर्ज भरलेला नाही. ग्रामीण भागाच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. रत्नागिरी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम आणि प्रशासकीय तयारीची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी तालुक्यात एकूण 10 जिल्हा परिषद गट आणि 20 पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, प्रशासनाने यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, 16 जानेवारी 2026 रोजी निवडणुकीची अधिकृत सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. 16 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र सादर करता येईल. मात्र, 18 जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी असल्याने त्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 22 जानेवारी रोजी प्राप्त अर्जांची छाननी केली जाईल, तर 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्याच दिवशी दुपारी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.
निवडणुकीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच मतदान 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडेल. त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन 10 फेब्रुवारीपर्यंत नवनिर्वाचित सदस्यांची नावे अधिकृतरीत्या जाहीर केली जाणार आहेत. निवडणुकीत रत्नागिरी तालुक्यातील एकूण 2 लाख 4 हजार 496 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीत पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांचे वर्चस्व दिसून येत असून, तालुक्यात 1 लाख 4 हजार 441 महिला मतदार तर 1 लाख 45 पुरुष मतदार आहेत. मतदानासाठी तालुक्यात एकूण 271 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी सखी मतदान केंद्रे, दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र केंद्रे आणि काही आदर्श मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.
संपूर्ण तालुक्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूक खर्चावर मर्यादा घालण्यात आली आहे. जिल्हा परिषद गटातील उमेदवाराला 6 लाख रुपये, तर पंचायत समिती गणाातील उमेदवाराला 4.50 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची परवानगी आहे. निवडणूक अर्जांची छाननी उपविभागीय अधिकारी कार्यालयात होईल, तर मतमोजणी कुवारबांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पार पडणार आहे. ईव्हीएम मशीनची तपासणी पूर्ण झाली असून, गरजेनुसार 110 टक्के यंत्रांची उपलब्धता प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
शुक्रवार 16 जानेवारीपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, रत्नागिरीत पहिल्या दिवशी 14 व्यक्तींनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून एकूण 30 अर्ज घेऊन गेले आहेत. यामध्ये शिवसेना उबाठाचे 7, शिवसेना 3, भाजप 1 आणि अपक्ष 3 व्यक्तींनी एकूण 30 अर्ज नेले आहेत. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज रत्नागिरीत दाखल झालेला नसल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र, पहिल्या दिवशी जिल्ह्यातील एकाही तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.