Ratnagiri Politics : जिल्हा परिषद युतीमध्ये शिवसेना मोठा तर भाजप छोटा भाऊ
रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री, शिवसेना नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे गुरुवारी रत्नागिरीत ठाण मांडून होते. जि.प. व पं.स. निवडणुकांसंदर्भात त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्ह्यात शिवसेना-भाजपने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असला तरी 56 पैकी 45 किंवा अधिक जागांवर लढण्यावर शिवसेना ठाम असून भाजपला 9 जागा सोडण्यात येणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला संगमेश्वरमध्ये दोन जागा सोडण्याबाबत चर्चांची खलबते सुरू आहेत. पंचायत समितीमध्ये मात्र 112 पैकी सुमारे 75 जागा लढवण्याची तयारी शिवसेनेने केली आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी रत्नागिरीतील बंगल्यावर शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, तर मुंबईमध्ये रत्नागिरीतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी जि.प. व पं.स. निवडणुकीबाबत चर्चा केली. पुढील दोन दिवसांत प्रदेशाध्यक्ष च्ाव्हाण रत्नागिरी दौऱ्यावर येत असून यावेळी युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे उमेदवार निश्चितीसाठी जोरदार तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. जिल्ह्यात पाच पैकी तीन आमदार हे शिवसेना, एक राष्ट्रवादी आणि एक उबाठा शिवसेनेचे आहेत. त्यामुळे महायुतीकरुन लढायचे की नगर पालिकांप्रमाणेच शिवसेना-भाजप युती करायची यावर चर्चा झाली. यात शिवसेना-भाजप युती करण्यावर सहमती दर्शवण्यात आली आहे.
जिल्ह्यात 56 पैकी जिल्हा परिषदेच्या कमीतकमी 45 जागा लढवण्याचे शिवसेनेने निश्चित केले आहे. तर भाजपाला नऊ जागा सोडण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत संगमेश्वर तालुक्यातच महायुती करण्यावर चर्चा करण्यात आली. याठिकाणी दोन जागांबाबत निर्णय केला जाणार आहे. रत्नागिरी व राजापूर-लांजा विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे वर्चस्व असल्याने याठिकाणी जि.प.साठी सर्वच जागा शिवसेना लढवणार असून भाजपाला एकही जागा सोडली जाणार नाही. मात्र गुहागरमध्ये पाच आणि संगमेश्वरमध्ये दोन अशा सात जागा सोडल्या जाणार आहेत. अन्य जागांबाबत लवकरच निर्णय होणार आहे.
जिल्ह्यात नऊ पंचायत समित्यांमध्ये 112 जागा असून त्यातील 75 जागा लढवण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. रत्नागिरी तालुक्यात पंचायत समितीचे तीन गण भाजपाला सोडले जाणार असून, यात हरचिरी, गावखडी व वाटद गणाचा समावेश असण्याची शक्यता आहे. दरम्यान, रत्नागिरीमध्ये पंचायत समितीमध्ये नाणिज गणातून डॉ. पंकजा कांबळे यांचे नाव पालकमंत्री सामंत यांनी शिवसेनेतर्फे जाहीर केले आहे. पहिल्याच उमेदवार आहेत.
शिवसेना-भाजपा युतीबरोबरच उबाठा शिवसेनेनेही जोरदार लढत देण्याची तयारी केली आहे. उबाठाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी सांगितले की, उमेदवारांच्या नावांची निश्चिती जवळपास झाली असून दोन दिवसात जाहीर केली जाणार आहेत. रत्नागिरी तालुक्यामध्येही तालुकाप्रमुख शेखर घोसाळे हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह जोरदार लढत देण्याच्या दृष्टीने बैठका घेत आहेत.

