

रत्नागिरी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील शाळांप्रमाणेच दर्जेदार शिक्षण आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी आणि विशेष निधीतून सुमारे १७ कोटी रुपये खर्च करून जिल्ह्यातील शाळांचे रूप पालटण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. स्मार्ट उपक्रमांतर्गत कोतवडे प्राथमिक शाळा क्रमांक १ आणि धामणसे सांबरेवाडी प्राथमिक शाळेचे लोकार्पण शनिवारी पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
कोतवडे शाळेचे कोनशिला अनावरण व फीत कापून त्यांनी उद्घाटन केले. यावेळी बोलताना डॉ. सामंत म्हणाले की, ग्रामीण भागातील शाळांच्या विकासासाठी मंजूर १७ कोटी रुपयांच्या निधीतून शाळांना सुसज्ज इमारती आणि आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या निकालात नेहमीच अव्वल क्रमांक राहिला आहे.
या यशामध्ये जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळे या शाळांचा दर्जा अधिक उंचावणे आवश्यक आहे. शाळांच्या विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा. शाळांचे नूतनीकरण करणे आणि उपलब्ध सुविधांचे जतन करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून पालक, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचीही जबाबदारी आहे. कठीण परिस्थितीतही विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडित सुरू ठेवणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य आणि प्रोत्साहन दिले पाहिजे.
ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था उच्च दर्जाची करण्यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि राज्य शासन प्रयत्नशील असून, भविष्यातही असे लोकोपयोगी उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास चाळके, जिल्हा परिषद सदस्य महेश ऊर्फ बाबू म्हाप, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी उपस्थित होते.