Ratnagiri : अनेक मातब्बरांना लागली ‘लॉटरी’

जिल्हा परिषद गट व गणांचे आरक्षण जाहीर; 28 गट महिलांसाठी राखीव
Ratnagiri News
अनेक मातब्बरांना लागली ‘लॉटरी’
Published on
Updated on

रत्नागिरी : जिल्हा परिषद 56 गटाचे तसेच 9 पंचायत समित्यांचे एकूण 112 गणांची आरक्षण सोडत सोमवारी जाहीर झाली. यामध्ये काही दिग्गजांना फटका बसला आहे तर काहींना मात्र लॉटरी लागली आहे. जिल्हा परिषदेचे

56 पैकी 28 गट महिला आरक्षित झाले आहेत. विक्रांत जाधव, रोहन बने, संतोष थेराडे, सहदेव बेटकर, रचना महाडिक, स्वरूपा साळवी, नेत्रा ठाकूर या मातब्बर नेत्यांना लॉटरी लागली आहे. तर आण्णा कदम, विनोद झगडे, बाबू म्हाप यांना फटका बसला आहे. या तिघांना आता दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी हे उपस्थित होते. सुरुवातीला हातखंबा, वाटद आणि हर्णे हे तीन गट अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित करण्यात आले. यामध्ये वाटद (रत्नागिरी) हा अनुसूचित जाती महिलासाठी तर हर्णे (दापोली) हा गट अनुसूचित जमाती महिलासाठी तसेच हातखंबा (रत्नागिरी) हा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षण काढण्यात आले. यामध्ये लोटे (खेड), दाभोळ (दापोली), कोेंडकारूळ (गुहागर), शिरगाव (चिपळूण), भरणे (खेड), अलोरे (चिपळूण), विराचीवाडी (खेड), पालगड (दापोली) तर नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी नाचणे (रत्नागिरी), सुकिवली (खेड), पडवे (गुहागर), शृंगारतळी (गुहागर), भडगाव (खेड), कर्ला (रत्नागिरी), जुवाठी (राजापूर) हे आरक्षित झाले आहेत.

यानंतर उर्वरित 38 जि.प. गटासाठी 18 सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव ठेवण्यात आले. यामध्ये कळवंडे (चिपळूण), पेढे (चिपळूण), धामणदेवी (चिपळूण), साटवली (लांजा), खेडशी (रत्नागिरी), आसगे (लांजा), वहाळ (चिपळूण), खेर्डी (चिपळूण), कसबा (संगमेश्वर), भांबेड (लांजा), मुचरी (संगमेश्वर), साखरीनाटे (राजापूर), काताळी (राजापूर), साडवली (संगमेश्वर), सावर्डे (चिपळूण), झाडगाव (रत्नागिरी), वेळणेश्वर (गुहागर), तळवडे (राजापूर) तर सर्वसाधारणसाठी केळशी (दापोली), कोतवडे (रत्नागिरी), उमरोली (चिपळूण), खालगाव (रत्नागिरी), जालगाव (दापोली), बाणकोट (मंडणगड), कोळबांद्रे (दापोली), भिंगळोली (मंडणगड), कोसुंब (संगमेश्वर), कडवई (संगमेश्वर), गोळप (रत्नागिरी), धामापूर तर्फे संगमेश्वर (संगमेश्वर), वडदहसोळ (राजापूर), धोपेश्वर (राजापूर), दयाळ (खेड), कोकरे (चिपळूण), असगोली (गुहागर), दाभोळे (संगमेश्वर), गवाणे (लांजा), पावस (रत्नागिरी) असे आरक्षण पडले आहे.

या आरक्षणामुळे अनेक मातब्बर नेत्यांना फटका बसला आहे. यामध्ये रामदास कदम यांचे बंधू व माजी बांधकाम सभापती आण्णा कदम यांचा समावेश आहे. त्यांचा भडगाव हा गट आरक्षित झाला आहे. त्यामुळे त्यांना आता दुसरा मतदार संघ शोधावा लागणार आहे. खेडमध्ये फक्त दयाळ हाच गट फक्त सर्वसाधारणसाठी राखीव आहे. चिपळूणमध्ये माजी जि.प. बांधकाम सभापती विनोद झगडे यांना फटका बसला आहे. त्यांचा गट आरक्षित झाला आहे. त्यांनासुद्धा दुसरा गट शोधावा लागणार आहे. रत्नागिरीमध्ये शिंदे गटाचे तालुकाप्रमुख व माजी जि.प. बांधकाम सभापती बाबू म्हाप यांचा शिरगाव हा गट आरक्षित झाला आहे. त्यांनासुद्धा दुसर्‍या गटाचा आधार घ्यावा लागणार आहे. या तीन तरी मातब्बरांना या आरक्षणाचा फटका बसला आहे.

संगमेश्वर तालुक्यातील मातब्बरांना मात्र त्यांच्या मनासारखेच आरक्षण पडले आहे. यामध्ये माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने यांचा कोसुंब गट हा सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे यांचा कडवई, शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांचा धामापूरतर्फे संगमेश्वर, शिक्षण सभापती विलास चाळके यांचा दाभोळे हे गट सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहेत. तर माजी जि.प. अध्यक्ष रचना महाडिक यांचा कसबा हा सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित झाला आहे. माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांचासुद्धा असगोली हा गट सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. तसेच जि.प. माजी सदस्य नेत्रा ठाकूर यांचा वेळणेश्वर हा गट सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव झाला आहे.

रत्नागिरीमध्ये नाचणे हा गट नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित झाला आहे. याचा फायदा माजी समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ यांना होणार आहे. त्याचबरोबर भाजपचे सतिश शेवडे यांचा कोतवडे हा गट सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. माजी उपाध्यक्ष उदय बने यांना मात्र त्यांचा जुना मतदार संघ असलेला गोळपचा आधार घ्यावा लागणार आहे. लांजामध्ये स्वरुपा साळवी यांचा गवाणे गट हा सर्वसाधारणसाठी राखीव झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news