

रत्नागिरी : जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यानंतर रत्नागिरीत भाजपा-शिवसेना युतीचे 45 सदस्य विजयी झाल्यामुळे आता अध्यक्षपदाच्या निवडीवर लक्ष लागले आहे. गुहागरमधील वेळणेश्वर गटातून विजयी झालेल्या नेत्रा नवनीत ठाकूर आणि मंडणगड तालुक्यातील भिंगळोली गटातून विजयी झालेल्या अस्मिता केंद्रे यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. शिवसेनेतर्फे अध्यक्षांना सव्वा वर्षांचा कालावधी दिला जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने 56 जागांपैकी 41 जागी विजय मिळवला होता. या निवडणुकीत 46 उमेदवार शिवसेनेने उभे केले होते. त्यातील पाचजणांना पराभूत व्हावे लागले. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण भैया सामंत यांच्यासह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात शिवसेनेने मोठी घौडदोड केली. जिल्ह्यात भाजपाने 4 जागांवर विजय मिळवला आहे. तर मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने मैत्रिपूर्ण लढा देत पाच जागी विजय संपादन केला. त्यामुळे महायुतीच्या जवळपास पन्नास जागा झाल्या आहेत.
जिल्हा परिषदेवर 41 जागा जिंकत शिवसेनेने एकहाती वर्चस्व राखल्यामुळे आता जिल्हा परिषद अध्यक्षपदावर लक्ष लागले आहे. महिलांसाठी ओबीसी राखीव असल्यामुळे याठिकाणी कुणाची निवड होते याकडेही लक्ष लागले आहे. गुहागरमधील वेळणेश्वरमधून विजयी झालेल्या नेत्रा ठाकूर या महिलांमध्ये अनुभवी सदस्य आहेत. शिवसेना उबाठामधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना अध्यक्षपदाचे आश्वासन मिळाल्याची चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे. उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांच्या एकेकाळी सहकारी म्हणून काम केलेल्या ठाकूर यांना अध्यक्षपद देऊन जाधवांना शह देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होऊ शकतो.
राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदार संघातील मंडणगड भिंगळोलीमधून विजयी झालेल्या अस्मिता केंद्रे याही अनुभवी सदस्य आहेत. यापूर्वीच्या जि.प.च्या कार्यकाळात काँग्रेसच्या सदस्य म्हणून त्यांनी चांगली कामगिरी बजावली होती. वर्षभरापूर्वी त्यांनी योगेशदादांच्या विकास कामाच्या पध्दतीवर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे केंद्रे यांचेही नाव आता चर्चेत आले आहे. ज्येष्ठ नेते रामदास कदम व मंत्री योगेश कदम हे कुणाच्या नावाला खेड-दापोली-मंडणगड मतदार संघातून पसंती देतात हे पहावे लागणार आहे.