

दीपक कुवळेकर
रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीची घोषणा मंगळवारी झाली आणि इच्छुक उमेदवारांचा जीव भांड्यात पडला. राजकीय हालचालींना गती आली आहे. तसेच इच्छुकही सक्रिय झाल्याचे दिसून येत आहेत. जिल्हा परिषदचे अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हे निश्चित झालं आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांच्या पत्नी, सुना निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सध्यातरी शिवसेना-भाजप-अजितदादा गट अशी युतीचं गणित जमलं आहे. मात्र आघाडीचं अजूनही तळ्यात मळ्यात असल्याचे दिसत आहे.
निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे अचानक आता इच्छुक मात्र मतदारसंघात घिरट्या घालताना दिसत आहेत. इच्छुकाच्या संख्या पाहता अनेक ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदची 2017 मध्ये निवडणूक झाली होती. जिल्हा परिषदच्या सभागृहाची मुदत 20 मार्च 2022 आणि 9 पंचायत समित्यांची मुदत 22 मार्च 2022 रोजी संपली. मात्र त्यानंतर कोरोना, पाऊस आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणामुळे निवडणूक मुदतीत झाली नाही. त्यामुळे मिनी मंत्रालयाचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समितींची जबाबदारी त्या त्या गटविकास अधिकाऱ्यांकडे देण्यात आली.
जिल्हा परिषदच्या इतिहासात दुसऱ्यांदा 46 महिने प्रशासकीय राज राहिलं. यापूर्वी 1982 ते 1992 असे दहा वर्षे जिल्हा परिषदेवर प्रशासक राज होतं. आता तब्बल आठ वर्षांनंतर निवडणूक होत आहे. नेतेमंडळींसह इच्छुकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषद गट व गणांची निश्चिती करण्यात आली. गेल्या निवडणूकीत 55 असलेली गटांची संख्या 56 केली तर पंचायत समिती गणांची संख्या 110 वरून 112 झाली. त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी गट-गणांची आरक्षण सोडत झाली. सोडतीवर हरकती सुनावणी घेऊन 3 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाकडे नेतेमंडळींसह इच्छुकांच्या नजरा लागून होत्या. मात्र 50 टक्के आरक्षणाबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे निवडणूक पुन्हा लांबणीवर गेली. एकंदरीत इच्छुकांमध्ये अस्वस्थता होती. मात्र 13 जानेवारी रोजी निवडणूक जाहीर झाल्याने पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये जोश वाढला आहे. ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार आहे.
नुकत्याच झालेल्या नगर परिषद व नगर पालिकेच्या निवडणूकीत जिल्ह्यात सर्वच ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) - भाजप युतीने एकतर्फी यश मिळवले. या निवडणूकीतसुद्धा हे दोघे एकत्रित लढणार हे निश्चित झालं आहे.
पंचयात समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी युतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा (अजितदादा गट) समावेश असणार आहे. बुधवारी याबाबाबत जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांची बैठकसुद्धा झाली. या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तबझालं आहे. जागा वाटपाबाबत घासाघीस अजूनही सुरू आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) या आघाडीत मात्र अजूनही एकमत झालेलं नाही. असे असले तरी सर्वच ठिकाणी इच्छुक कामाला लागलेले दिसत आहेत. एकंदरीत या निवडणुकीत बंडखोरी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता दाट आहे.