

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन आता दीड महिना गेला आहे. निवडणुकीत मोठी आश्वासने देऊन सर्वच पक्षांचे सदस्य निवडून आले आहेत. आता दीड महिना झाला अद्याप विकासकामाला निधी मिळालेला नाही. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांच्या रोषाला सामना सदस्यांना करावा लागत आहे. निधीच नाही, तर विकासकामे करायची कधी, अशी विचारणा आता सदस्य जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडे करत आहेत.
जिल्हा परिषदेत 56 सदस्य आहेत. सुमारे पाच वर्षानंतर नवे सभागृह अस्तित्वात आले. सुरूवातीचे काही दिवस पदाधिकारी निवडीत गेले. अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समितीच्या सभापतींची निवड बिनविरोध झाल्या, तर सदस्यपदासाठी विरोधकांना संधी देत निवडी बिनविरोध करण्यात आल्या. निवडून आल्यापासून दीड महिना होवून गेला.
नव्या सदस्यांना तर अद्याप कामकाजाची माहितीदेखील नाही. अनेक प्रश्न उपस्थित करत जिल्हा परिषद सदस्य पदाधिकाऱ्यांना विचारत आहेत. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या सदस्यांना विकासकामांसाठी निधी देण्यासाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात येते. सदस्य संख्या 56 आहेत. यामध्ये संपूर्ण जिल्हा कव्हर करावा लागतो. जिल्हा परिषदेचे जे सत्ताधारी पक्ष आणि पदाधिकारी आहेत ते जादा निधी घेतात, तर त्यानंतर उर्वरित सदस्यांना विकासकामांसाठी साधारणपणे 80 लाख ते 1 कोटीचा निधी दिला जातो. यामध्ये सदस्य रस्ते, गटार, वीज यासह विविध विकासकामांवर निधी खर्च करत असतात.
आता निवडणूक होवून दीड महिना होवून गेला तरीदेखील निधीचा पत्ता नाही. जून महिन्यापासून पावसाळा सुरू होणार आहे. शाळा इमारती दुरूस्ती, रस्ते दुरूस्ती, लाईट यासह विविध विकास कामासाठी निधीची आवश्यकता आहे. निधीच नाही तर विकासकामे करायची कधी, असा सवाल आता सदस्यांच्यातून उपस्थित केला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचे काम करण्यासाठी बांधकाम, शिक्षण, पाणीपुरवठा, कृषी, समाज कल्याणसह विविध विभागांना निधीची आवश्यकता आहे. सेसमधून काही निधी शिल्लक आहे. मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. निधीअभावी कामे रखडली आहेत.
लवकरच अध्यक्ष अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके तसेच सर्व सभापती पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार असून डीपीसीमधून निधी द्यावा अशी मागणी करणार आहेत. निधी आल्यानंतर खऱ्याअर्थाने प्रलंबित कामे मार्गे लागतील अशीच चर्चा सभापती, सदस्यांमधून होत आहे. निधीसंदर्भात लवकरच आराखडा करण्यात येत असून निधी आल्यानंतर सभापतींकडून निधी वाटप होण्याची शक्यता आहे.