

दीपक कुवळेकर
रत्नागिरी : जिल्हा परिषदला मिनी मंत्रालय म्हटले जाते. नेतृत्व घडवणारी पाठशाळा असेही म्हटले जाते. या पाठशाळेत राजकारणाचे धडे गिरवलेले चार नेते आमदार झाले. जि.प. सभागृहाप्रमाणेच त्यांनी मंत्रालयाचं सभागृहही गाजवले. यामधील भास्कर जाधव यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरवण्यात आले. त्याचबरोबर त्यांनी मंत्रिपदही भूषविले. या पाठशाळेतून गोविंदराव निकमही लोकसभेत गेले. याव्यतिरिक्त शिवाजीराव जड्यार, सुभाष बने, संजय कदम हे तीन आमदार बनले.
मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद म्हणजे नेतृत्व घडवणारी कार्यशाळा होय. त्यामुळे जिल्हा परिषदेत प्रतिनिधीत्व करणाऱ्यांचे मोठे महत्व आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण किती झाले, जिल्हा परिषदला अधिकार दिल्याचे नुसते ढोल पिटले जात आहेत का, जिल्हा परिषदला अधिकार देणे तर दूरच उलट कायद्याने दिलेले अधिकारही परत घेतले जात आहेत. ग्रामीण विकासातील जिल्हा परिषदेचे महत्त्व आजही कमी झालेले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्यामाध्यमातून मतदार संघाच्या ग्रामीण विकासाचा शब्द देवून आलेल्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी निश्चित वाढत आहे.
जिल्ह्याच्या सत्ताकारणाचे प्रतीक म्हणून जिल्हा परिषदेची विलक्षण क्रेझ आहे. यामुळे जिल्हा परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू असते. रत्नागिरी जिल्हा परिषदेचा इतिहास पाहिला तर अनेक दिग्गज व अभ्यास नेते घडले आहेत. अलीकडच्या काळात फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच नेत्यांनी हा वारसा जपला आहे. काही नेत्यांनी व्यासपीठ गाजवून आपले नेतृत्व उभे केले आहे. यामध्ये शिवाजीराव जड्यार, गोविंदराव निकम, सुभाष बने, भास्कर जाधव, संजय कदम यांनी हे व्यासपीठ गाजवून वरिष्ठ सभागृहात प्रवेश केला आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिले आमदार बनले ते शिवाजीराव जड्यार. रत्नागिरी तालुक्यातील असलेल्या जड्यार यांनी उत्कृष्ट नेतृत्वामुळे त्यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदी बसण्याचा मानही मिळाला होता. जड्यार हे 1978 साली जि. प. अध्यक्ष बनले. त्यांचा हा अनुभव लक्षात घेवून काँग्रेस पक्षाने त्यांना 1985 साली रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. यावेळी त्यांच्यासमोर एकूण सात उमेदवार उभे राहिले होते.
भाजपचे नेते शिवाजीराव गोताड यांचा त्यांनी पराभव करत विजय मिळवला होता. यावेळी शिवाजीराव जड्यार यांना 30 हजार 598 तर शिवाजीराव गोताड यांना 19 हजार 252 मते मिळाली होती. 1990 या निवडणुकीत मात्र शिवाजीराव जडयार यांना पराभव स्वीकारावा लागला. यावेळी शिवाजीराव गोताड हे विजय झाले. जड्यार यांना 31 हजार 729 तर गोताड यांना 39 हजार 823 मते मिळाली होती. हा पराभव झाल्यानंतर मात्र जडयार हे पुढील निवडणुकीत उभे न राहण्याचा निर्णय घेत पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले.
1992 साली चिपळूणमधून शिवसेनेकडून भास्कर जाधव हे जिल्हा परिषदेवर निवडून आले. यावेळी काँग्रेसची सत्ता असल्याने भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले. सभागृहात सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. यामुळे नेहमीच ते चर्चेत राहिले. अगदी मुद्देसूद बोलून सत्ताधाऱ्यांना कोंडित पकडण्याचे काम भास्कर जाधव करत होते. त्यांच्या या कामाची दखल मातोश्रीवर घेण्यात आली. त्यांना 1995 साली विधानसभा निवडणुकीमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी त्यांच्या समोर ज्येष्ठ नेते बाळासाहेब माटे हे उभे होते. यावेळी भास्कर जाधव यांना 49 हजार 715 तर बाळासाहेब माटे यांना 42 हजार 476 मते मिळाली होती. 7 हजार मतांनी भास्कर जाधव यांनी बाजी मारली होती.
भास्कर जाधव यांनी जि. प. सदस्य तसेच विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा देऊन ही निवडणूक लढवली होती. भास्कर जाधव यांनी या सभागृहाप्रमाणेच मंत्रालयातील सभागृह हे चांगलेच गाजवले. गेली 20 वर्षे ते आमदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना शासनाने उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरवले आहे.
सध्याही गुहागर विधानसभा मतदारसंघातून आपले नशिब आजमावत आहेत. भास्कर जाधव प्रमाणेच संगमेश्वर तालुक्यातील सुभाष बने यांचीही सभागृहातील आक्रमक भूमिका गाजली होती. सुभाष बने यांनी 1998 साली जि. प. अध्यक्षपदही भूषवले. त्यांनीही आपल्या आक्रमकतेची चुणूक दाखवत जि.प.मधील विकासासाठी चांगली भूमिका बजावली. सुभाष बने हे अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शेवटच्या टप्प्यापासून आलेले आहेत. अगदी ग्रामपंचायतीचा कारभारही त्यांनी पाहिला. त्यानंतर ते पंचायत समिती सदस्य झाले. संगमेश्वर पंचायत समितीचे सभापती हे पदही त्यांनी भूषवले त्यांच्याही या कार्याची मातोश्रीने दखल घेतली. 2004 साली संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई हे होते. मात्र सुभाष बने यांनी बाजी मारत विजयी झाले. सुभाष बने यांना 55 हजार 415 तर हुसेन दलवाई यांना 20 हजार 246 मते पडली. सुभाष बने यांचीसुद्धा विधानसभेची कारकिर्दी उत्तम होती. खेडमधील संजय कदम यांनीही जि.प.चे सभागृह गाजवले. संजय कदम हे 2005 साली उपाध्यक्ष बनले. तब्बल 15 वर्षे ते जि. प. सदस्य होते. शिवसेनेने त्यांना विधानसभेसाठी तिकीट नाकारल्याने शेवटी संजय कदम यांनी राष्ट्रवादीची वाट पकडली.
2014 साली झालेल्या विधानसभा दापोलीमधून संजय कदम हे राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ आ. सूर्यकांत दळवी यांचा पराभव केला. संजय कदम यांनी निवडणूक लढवण्यापूर्वी जि. प. सदस्यपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यामुळे आतापर्यंत जि. प. मधून चार आमदार मंत्रालयाला दिले गेले आहेत.