

रत्नागिरी : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जि.प. गट आणि पंचायत समिती गणांचा प्रारूप मसुदा जाहीर केला आहे. नव्याने केलेल्या प्रारूप प्रभाग पुनर्रचनेत 62 गटांची संख्या 56, तर 124 गणांची असलेली संख्या आता 111 झाली आहे. दरम्यान, या गट आणि गणांवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत 21 जुलै आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी हा गट वाढला आहे.
जिल्हा प्रशासनस्तरावरून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेमुळे इच्छुक उमेदवारांसह स्थानिक नेत्यांमध्ये आपल्या मतदारसंघाची संभाव्य पुनर्रचना समजून घेण्यासाठी आणि त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ही प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तसेच नऊ तहसील आणि पंचायत समिती कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये काही प्रभागांची व्याप्ती वाढू शकते, तर काहींची कमी होऊ शकते. नवीन गावांचा समावेश किंवा जुन्या गावांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.