

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाच्या निवडी बुधवारी बिनविरोध पार पडल्या. समाजकल्याण सभापतिपदी ॲड. सुयोग कांबळे, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी मयुरी शिर्के, अर्थ व शिक्षण समिती सभापतिपदी नंदकुमार मुरकर, तर कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतिपदी महेश नाटेकर यांची निवड झाली. बुधवारी चारही जणांचा पदग्रहण सोहळा पार पडला.
रत्नागिरीचे पालकमंत्री व शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची अधिकृत घोषणा केली. जिल्हा परिषदेचे अत्यंत अभ्यासू सदस्य उदय बने या मातब्बर नेत्याचा पराभव करणाऱ्या नंदकुमार मुरकर यांना अर्थ व शिक्षण समिती सभापतिपदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. तसेच, समाजकल्याण समितीचे माजी सभापती परशुराम कदम यांच्या बंडखोरीला न जुमानता ॲड. सुयोग कांबळे यांनी त्यांचा पराभव केल्याने त्याचे बक्षीस म्हणून त्यांची समाजकल्याण सभापतिपदी वर्णी लावली आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या विलास चाळके यांच्याकडे बांधकाम व आरोग्य विभागाचा कार्यभार सोपवला आहे. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी चिपळूणच्या मयुरी मिलिंद शिर्के, तर कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतिपदी गुहागर तालुक्यातून महेश नाटेकर यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या सर्व नियुक्त्या केवळ सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांनी सभागृहात येऊन चारही सभापतींचे अभिनंदन केले. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार संजय कदम, सदस्य अण्णा कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, रत्नागिरी तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांच्या उपस्थितीत सर्व नूतन सभापतींनी पदग्रहण केले.