

रत्नागिरी : स्पर्धेच्या युगात पालकांकडून पाल्यांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र या ओझ्याखाली मुले दबत चालली आहेत. कधी टीका, कधी तुच्छ लेखणे यासह विविध सवयीमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व खुंटत चालले आहे. मुलांना प्रेम, आपुलकी, सन्मान मिळावा, त्यांचा आदर व्हावा, मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाने यांच्या संकल्पनेतून माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने ‘रिस्पेक्ट टू चाईल्ड’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
शालेय जीवनातच मुले घडत असतात. मात्र मुले कशा पध्दतीने घडावीत यासाठी पालक आपल्या पाल्यांना आवडी, निवडी न विचारता अमूकच क्षेत्रात करिअर कर म्हणून अपेक्षांचे ओझे पाल्यांवर लादले जात आहे. त्यामुळे मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास खुंटत चालला आहे. पालकांकडून कधी राग, कधी मारहाण होते. असे होऊ नये, त्यांच्या आवडी, निवडीचा विचार व्हावा, प्रेमाने, समजून घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास कशा प्रकारे करता येईल, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद अधिकारी, पदाधिकारी, विविध शाळांमध्ये जनजागृतीसाठी एक दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहे. १६ जूनपासून माध्यमिक शाळांनाही फलक लावण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.