

रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा : शहरानजीकच्या चंपक मैदान येथे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या तरुणाला न्यायालयाने १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ॠषीकेश दगडू तळेकर (वय 24, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. (Ratnagiri Crime News)
याबाबत पीडितेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, ३० जून २०२० रोजी रात्री 8 वाजता पीडिता कामावरुन घरी जात होती. त्यावेळी तिच्या ओळखीचा असलेला ॠषीकेष आपल्या दुचाकीवरुन तेथून जात असताना त्याने तुला घरी सोडतो, असे सांगून आपल्या दुचाकीवर बसवले. त्यानंतर त्याने पीडितेला चंपक मैदान येथे नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. (Ratnagiri Crime News)
याबाबत पीडितेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक मुक्ता भोसले यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. (Ratnagiri Crime News)
हा खटला न्यायालयात सुरु होता. सरकारी पक्षातर्फे अॅड. मेघना नलावडे यांनी 20 साक्षीदार तपासत युक्तिवाद केला. जिल्हा व सत्र न्यायाधिश अनिल. एम. अंबाळकर यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद एकूण झाल्यानंतर आरोपी ॠषीकेशला १० वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.