

लांजा : अज्ञात कारणावरून एका 21 वर्षीय तरुणाने घराशेजारील आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भूषण राजेश मठकर (21, रा. मठ, मठकरवाडी, ता. लांजा) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कौटुंबिक अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही भूषण एका महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. शुक्रवारी सायंकाळी कोणालाही न सांगता तो घरातून बाहेर पडला. मात्र, सायंकाळी उशीर होऊनही तो घरी न परतल्याने आई, वडील व घरच्यांनी आजूबाजूला व नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता भूषण कुठेच सापडला नाही. शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास मठ येथील भवानी सोमेश्वर मंदिरामध्ये पुजारी पूजा-अर्चा करण्यासाठी आले असता त्यांना एका आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत भूषण आढळून आला.
याबाबतची माहिती त्यांनी नागरिकांना दिल्यानंतर या घटनेची माहिती लांजा पोलिस ठाण्यात देण्यात आली. लांजा पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम करून मृतदेह लांजा ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनेचा अधिक तपास लांजा पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड काँन्स्टेबल राजेंद्र कांबळे करत आहेत. भूषण याच्या निधनामुळे मठ परिसरात शोककळा पसरली आहे. मात्र, या घटनेतील भूषण याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.