

देवरुख : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे डोंगरावरून कोसळलेल्या दगडाने एका निष्पाप चिमुकलीचा नाहक बळी घेतला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, ही केवळ नैसर्गिक आपत्ती नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडलेली मानवनिर्मित दुर्घटना असल्याचा गंभीर आरोप आता समोर आला आहे. वारंवार लेखी तक्रारी देऊनही प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यानेच या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागल्याची संतप्त भावना जनमानसात धुमसत आहे.
सुरुंग स्फोटांमुळे खडक सैल?
श्री दत्त मंदिराकडे जाणाऱ्या फूटब्रिजच्या कामासाठी नदीपात्रात सुमारे ५० ते ६० सुरुंग स्फोट करण्यात आले. या स्फोटांच्या हादऱ्यांमुळेच डोंगरावरील खडक सैल होऊन ते कोसळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ५ जानेवारी २०२६ रोजी पोलिसांना आणि ३० एप्रिलला सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामस्थांनी याबाबत लेखी निवेदने दिली होती. १५ फेब्रुवारीला महाशिवरात्रीलाही असाच एक दगड कोसळून काही महिला भाविक जखमी झाल्या होत्या. एवढे घडूनही प्रशासनाने कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नाहीत.
या दुर्घटनेनंतर शनिवारी शंभराहून अधिक संतप्त ग्रामस्थ आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी देवरुख पोलिस ठाण्यावर धडक दिली. चिमुकलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर तत्काळ 'सदोष मनुष्यवधा'चा गुन्हा दाखल करा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. वेळीच उपाययोजना केली असती, तर आज एका कोवळ्या जिवाचा अंत झाला नसता, अशी हळहळ संपूर्ण परिसरात व्यक्त होत आहे.
अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात?
केवळ ठेकेदारावर कारवाई करून चालणार नाही, तर या बांधकामाला परवानगी देणारे अधिकारी आणि सुरक्षेकडे कानाडोळा करणाऱ्या अभियंत्यांचीही सखोल चौकशी व्हावी, अशी आक्रमक मागणी किसान काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील व ग्रामस्थांनी केली आहे.