

रत्नागिरी ः सोशल मीडियावर ‘वर्क फ्रॉम होम’च्या आकर्षक संधीच्या नावाखाली एका महिलेची तब्बल 10 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. ही घटना 8 मे 2025 ते 27 मे 2025 या कालावधीत कुवारबाव परिसरात घडली. याप्रकरणी प्रवीण (पूर्ण नाव माहीत नाही) आणि आणखी एक प्रवीण (पूर्ण नाव माहीत नाही) अशा दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रोहिणी मंदार गीते (वय 45, रा. साईगण वृंदावन सोसायटी, कुवारबाव, रत्नागिरी) यांनी शुक्रवार, 6 जून रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर ‘वर्क फ्रॉम होम’ची जाहिरात दिली होती. ही जाहिरात ‘स्केचर्स’ या प्रसिद्ध कंपनीमध्ये कामासाठी असल्याची बतावणी करण्यात आली होती.
जाहिरातीला प्रतिसाद देत रोहिणी गीते यांनी संशयितांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना टेलिग्राम अकाउंटवर अधिक माहिती देण्यात आली. सुरुवातीला, फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना कस्टम ऑर्डरसाठी काही रक्कम भरण्यास सांगून त्यावर योग्य परतावा देण्यात आला. यामुळे गीते यांना या योजनेवर विश्वास बसला.
त्यानंतर, अधिक परताव्याच्या आमिषाने रोहिणी गीते यांनी आपल्या बँक खात्यातून संशयितांनी सांगितलेल्या खात्यांवर एकूण 10 लाख रुपये भरले. मात्र, ही रक्कम भरल्यानंतर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. इतकेच नव्हे तर, त्यांनी गुंतवलेली मूळ रक्कम देखील परत न करता संशयितांनी त्यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गीते यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही अनोळखी जाहिरातींवर विश्वास ठेवण्यापूर्वी आणि आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.