

रत्नागिरी : ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ या पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत साकारण्याच्या द़ृष्टीने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्याला नामनिर्देक्षित करण्यात आले होते. यात महाराष्ट्राची ‘गोल्डन कॅटेगरी’मध्ये निवड झाली असून, त्यात रत्नागिरी जिल्हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे.
राष्ट्रीय ‘एक जिल्हा, एक उत्पादन पुरस्कार 2024’ नवी दिल्ली येथे पार पडला. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून 14 जिल्ह्यांमधून 5 जिल्ह्याची निवड या पुरस्कारासाठी झाली आहे. पाच जिल्ह्यांना पारितोषिक मिळाल्याने महाराष्ट्राची निवड गोल्डन कॅटेगरीमध्ये करण्यात आली असून, रत्नागिरी जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक मिळाले आहे. राज्यात रत्नागिरीसह नाशिक, अमरावती, नागपूर व अकोला या जिल्ह्यांची निवड झाली आहे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली होती. हापूस आंबा व त्यावर निगडित उत्पादनांबाबत प्रत्यक्ष भेट देऊन सादरीकरण केले होते. यावेळी भारतीय उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सहव्यवस्थापक ताशी डोर्जे शेर्पा यांनी रत्नागिरी जिल्ह्याला भेट देऊन पाहणी केली होती. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी रत्नागिरीच्या हापूस आंब्याचा यावेळी विशेष उल्लेख कार्यक्रमामध्ये केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रोत्साहनामुळे हा पुरस्कार मिळाल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.