साडवली; पुढारी वृत्तसेवा : संंगमेश्वर तालुक्यातील कुळ्येवाशी येथील बसथांब्यावर मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या प्रौढावर रानडुकराने अचानक हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाले आहेत. तर रानडुकराने वडिलांवर अचानक हल्ला केल्याचे बघताच त्यांची मुलगीही घाबरून पडली. यात तिलाही दुखापत झाली आहे. ही घटना सोमवारी सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, रानडुकराने प्रौढावर हल्ला केल्याच्या प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कुळ्येवाशीतील सुहास गुरव यांची मुलगी संपदा ही बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालयात दहावीचे शिक्षण घेत आहे. संपदाला शाळेत सोडण्यासाठी तिचे वडिल सुहास हे तिच्यासोबत बसथांब्यावर गेले होते. सोमवारी सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास बाप-लेक बसथांब्यावर बसची वाट पाहत असताना जवळच्या जंगलातून अचानक रानडुकराने धावत येत सुहास यांच्यावर हल्ला चढवला. वडिलांवर रानडुकराने हल्ला केल्याचे संपदाने पाहताच तिही घाबरून जमीनीवर पडली. यामध्ये तिलाही दुखापत झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी सुहास गुरव व संपदा गुरव या दोघांना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे वनरक्षक राजाराम पाटील यांनी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात जावून जखमींची विचारपुस केली.