

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने मोठी निराशा केल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतीसाठी पाण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप पिकांसह भाजीपाला व अन्य पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. तसेच नदी, धरणातील पाणीसाठा कमी होत असून, पिण्यासाठी पाण्याची परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावंलबन योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात पूर्ण झालेल्या ४७ विहिरी शेतकऱ्यांना सिंचनासाठी आधार देणार आहेत. दुष्काळात जिल्ह्यातील विहिरी जलसंजीवनी ठरणार असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी स्वावलंबन योजनेतून विहिरींची कामे हाती घेण्यात आली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ४७ विहिरींची कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामेही टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना पावसावर अवलंबून न राहता उपलब्ध पाण्याचा वापर करून शेती करण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, या योजनेसाठी सन २०२५-२६ साठी ३ कोटी रुपये प्राप्त झाले असून, १ कोटी ८१ हजार १३५ रुपये खर्च झाले आहे. तर १ कोटी रुपये शिल्लक आहे. कृषी स्वावलंबन ही योजना यंदाही सिंचन विहिरींची उपलब्धता झाल्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण व दीर्घकालीन सकारात्मक परिणाम दिसत आहेत. यामुळे पाणीसाठा वाढत असून शेतकऱ्यांना वर्षभर सिंचनाची सुविधा मिळत आहे. रब्बी, खरीप, उन्हाळी हंगामात विविध पिके घेणे शक्यत झाली आहेत. आंबा, काजू, नारळ, सुपारीसारख्या फळबागांना पाणी देणे शक्य झाले आहे. तसेच काही शेतकरी पिण्यासाठी ही पाण्याचा वापर करीत आहेत.
श्रमदानातून ४३१ बंधारे
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती ओढावल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने वनराई बंधारे बांधण्यासाठी नियोजन केले आहे. जिल्ह्याला १२ हजार बंधाऱ्याचे उद्दिष्ट असून श्रमदानातून आतापर्यंत कच्चे २२०, वनराई बंधारे ८५, विजय बंधारे १२६ असे तिन्हीमिळून ४३१ बंधारे बांधले आहेत. येत्या काही दिवसात या कामाला गती मिळणार आहे. चिपळूण ७२, दापोली ६३, गुहागर ७५, खेड २०, लांजा ६०, मंडणगड १२, राजापूर ३९, रत्नागिरी ६७, संगमेश्वर २३ बंधारे उभारले आहेत.