

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. अखेर कोकण किनारपट्टीवर हवामानात मोठा बदल होणार असून जिल्ह्यात आज रविवार व सोमवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. लाडक्या बाप्पाबरोबरच कोकणात वरूणराजाचेही आगमन होणार आहे.
मागील साडेतीन महिन्यात जुलै महिना वगळल्यास जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने विश्रांतीच घेतली आहे. जिल्ह्यात प्रचंड उन्हाचे चटके बसत असून उकाडा जाणवत आहे. दरम्यान, मुंबई हवामान विभागाच्या माहितीनुसार शनिवारी रात्रीपासून हवामान बदल होणार आहे. रत्नागिरीसह रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. रविवार, १३ व सोमवार, १४ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
आतापर्यंत सरासरी २,५७३ मि.मी. पाऊस
१ जून ते १२ सप्टेंबरदरम्यान गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यात १०० टक्के पाऊस झाला होता. सरासरी ३ हजार ३८३ पाऊस पडला होता; मात्र याच कालावधीत जिल्ह्यात यंदा ७६.५२ टक्के, तर सरासरी २ हजार ५७३ मि.मी. इतका पाऊस पडला आहे. एकंदरीत गतवर्षीपेक्षा यंदा २४ टक्के कमी पाऊस झाला आहे.