

रत्नागिरी : जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: झोडपून काढले. अवघ्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण ८९४.६३ मिमी पावसाची नोंद झाली. चिपळूणमध्ये सर्वाधिक १२८.४४ मिमी, तर लांजात १२७ मिमी पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे नद्या आणि धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून, खेड येथील जगबुडी नदी ५.५० मीटरवर पोहोचत इशारा पातळी गाठली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात १७ जुलैपासून पावसाने दमदार पुनरागमन केले असून सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिला. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. दुसरीकडे भात लावणीच्या कामांना वेग आला असून धबधबे प्रवाहित झाल्याने वर्षा पर्यटनालाही चालना मिळाली आहे.
चार तालुक्यांत शंभरी पार
मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये शंभर मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. चिपळूणमध्ये १२८.४४ मिमी, लांजात १२७ मिमी, मंडणगडमध्ये १०७.७५ मिमी, तर खेडमध्ये १०५.१४ मिमी पाऊस झाला. दापोली आणि गुहागर तालुक्यांतही ९५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.
नद्या-धरणांच्या पाणीपातळीत वाढ
जगबुडी नदीची पातळी ५.५० मीटरवर पोहोचून इशारा पातळी गाठली आहे. वशिष्ठी (३.१४ मी.), शास्त्री (४.०० मी.), काजळी (१३.७० मी.), बावनदी (६.३२ मी.) यांसह अन्य नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. धरणांमध्येही पाणीसाठा वाढत असून मुचकुंदी धरण १०० टक्के भरले आहे. अर्जुना धरणात ८२.५३ टक्के, गडानदीत ८०.८० टक्के, तर नाटूवाडी धरणात ६७.४९ टक्के पाणीसाठा झाला आहे.
सिंधुदुर्गात पावसाच्या सरीवर सरी
कणकवली : जुलै महिन्याचे १०-१२ दिवस दडी मारल्यानंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्गात पाऊस सक्रीय झाला आहे. सोमवारी जिल्हयात पावसाच्या सरीवर सरी पडत होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा नदी नाल्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. तर पावसामुळे रखडलेली भात लावणी आता वेगात सुरू झाली असून ही कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. चांगल्या पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.