Ratnagiri Rain : जिल्‍ह्यात दमदार पाऊस; चोवीस तासांत ४२२ मि.मी. नोंद

नद्या, धरणांतील पाणी पातळी वाढली; जगबुडी नदी इशारा पातळीवर : काही दिवस पावसाचा जोर
Ratnagiri Rain update
खेड : नारिंगी नदी किनाऱ्यावरील गणेश विसर्जन घाट पुराच्या पाण्याखाली गेला आहे.
Published on
Updated on

रत्‍नागिरी : रत्‍नागिरी जिल्‍ह्यात १७ जुलैपासून पावसाने पुनरागमन केल्‍यामुळे शेतकरी आनंदात आहेत. जिल्‍ह्यात २४ तासांत तब्‍बल ४२२ मि.मी. इतका पाऊस पडला आहे. त्‍यामुळे नदी, धरणांतील पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली आहे. शहर, तालुक्‍यात प्रमुख बाजारपेठेतील रस्‍ते जलमय, चिखलमय झाले आहेत. खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीच्‍या वर गेली आहे. आणखी काही दिवस जिल्‍ह्यात पावसाचा जोर राहणार असल्‍याचे हवामान खात्‍याने वर्तविले आहे.

जिल्‍ह्यात जुलै महिन्‍याच्‍या दुसऱ्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती. जिल्‍ह्यात तापमान वाढले होते. उकाड्याने रत्‍नागिरीकर हैराण झाले होते. दुसरीकडे पावसाअभावी भात लावणी थांबली होती. पिके पिवळी पडत होती. त्‍यामुळे कोकणातील शेतकरी चिंताग्रस्‍त झाला होता. अखेर पावसाने दमदार हजेरी लावल्‍यामुळे शेतकऱ्यांकडून भात लावणीला वेग आला आहे. उकाड्याने हैराण झालेल्‍या रत्‍नागिरीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारी रात्रभर मुसळधार, तर कधी पावसाची विश्रांती सुरू आहे. जिल्‍ह्यात चोवीस तासांत ४२२ मि.मी. इतका, तर सरासरी ४६.९० मि.मी. इतका पाऊस पडला आहे.

जिल्‍ह्यातील धबधबे प्रवाहित

रत्‍नागिरी जिल्‍ह्यात पहिल्‍या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्‍यानंतर पाऊस गायब झाला होता. अखेर १७ जुलैपासून पावसाने दमदार पुनरागमन झाले आहे. त्‍यामुळे रत्‍नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, लांजासह इतर तालुक्‍यांतील धबधबे प्रवाहित झाले आहे. त्‍यामुळे आता पर्यटक वर्षा पर्यटनासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडू लागले असून, जिल्‍ह्यात मोठी गर्दी होत आहे.

भात लावणीला वेग

जिल्‍ह्यात पावसाने दडी मारल्‍यामुळे भात पुनर्लागवड पूर्णपणे थांबली होती. काहीजण बोअरच्‍या पाण्याचा वापर करून भात लावणी करीत होते. तर काही शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत होते. अखेर पावसाचे दमदार कमबॅक झाल्‍यामुळे भात लावणीला पुन्‍हा मोठा वेग आला आहे. लांजा, राजापूर, संगमेश्वर, दापोली, रत्‍नागिरीसह विविध तालुक्‍यांत भात लावणी अंतिम टप्‍प्‍यावर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news