Ratnagiri News| रत्‍नागिरीकरांवरही पाणी कपातीची टांगती तलवार!

न. प. सभेत निर्णय नाही; दुष्काळी परिस्‍थितीमुळे अनधिकृत जोडण्‍या व वॉशिंग रॅम्‍पला पाणी बंदच्‍या सूचना
 Water Supply
Water SupplyPudhari
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : अल निनोचा वाढता प्रभाव व भविष्यातील पाणीटंचाईचा धोका लक्षात घेता शहरात पाणी कपात करणे अटळ झाले आहे. त्यामुळे दर सोमवारी पाणी कपात करावी का, असे पालिकेच्या विचाराधीन आहे. याबाबत नगरपालिकेच्‍या बुधवारी झालेल्‍या सर्वसाधारण सभेत एकमत झाले नसले तरी पाणी कपातीवर लवकरच निर्णय होणार आहे. अनधिकृत जोडण्या तोडणे व वॉशिंग रॅम्पला पालिकेच्या जोडणीचे पाणी बंद करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. सभेत होणाऱ्या ठरावांवर प्रशासनाकडून ठोस कार्यवाही केली जात नसल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. तेच विषय परत परत येत असतील तर सभा कशाला घ्यायच्या, अशी आगपाखड सत्ताधाऱ्यांनी करत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखालील या सभेला उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, मुख्याधिकारी वैभव गारवे उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा सुर्वे म्हणाल्या, यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न पार पडला. शांततेत गणपती गेले, परंतु गणेश विसर्जनानंतर मांडवी समुद्र किनारी ज्या गणेशमूर्तीं किनाऱ्यावर लागल्या त्यांचे दुसऱ्या दिवशी मांडवीतील काही तरुणांनी नगरसेवक बंटी कीर यांच्यासोबत पुन्हा विसर्जन केल्‍याबद्दल सर्वांचे आभार मानले.

पाणी काटकसरीने वापरावे

यावेळी पाणी सभापती निमेश नायर म्‍हणाले, अल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पाऊस पडला आहे. भविष्यात पडेल याची खात्री नाही. त्यामुळे आतापासूनच पाणी नियोजन करण्याची गरज आहे. त्यासाठी यापुढे दर सोमवारी आपण एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घ्यावा, असे मला वाटते.

यावर उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी सांगितले की, आपण एक दिवस पाणी कपात करण्यापेक्षा दरदिवशी जी वेळ दिली आहे, त्यामध्ये १० मिनिटांची कपात केली, तर लोकांना कपातीचा त्रास होणार नाही आणि पाणीही मिळेल. मात्र यावर फक्त चर्चा झाली. काही दिवस वाट पाहून यावर निर्णय घेऊ, असे सभागृहाने ठरवले. परंतु नागरिकांनी आता यापुढे पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन सर्वांनी केले. शहरातील गाड्या धुण्याचे रॅम्प आणि अनधिकृत व्यावसायिक पाण्याचा वापर तत्काळ बंद करून त्यांना पर्यायी व्यवस्था देण्याची मागणी करण्यात आली.

ठरावावर कार्यवाही होत नाही

सभागृहात जे ठराव होतात व बोलले जाते त्यावर काहीच कार्यवाही होत नाही हे चुकीचे आहे. अनधिकृत रॅम्प आणि नळ जोडण्यांना अद्याप दंड का लावला नाही? असा प्रश्न विचारत लोकप्रतिनिधींनी प्रशासकीय मंद कारभारावर तीव्र ताशेरे ओढले. यावेळी भाजपच्‍या वर्षा ढेकणे यांनीही शहरातील रामआळीतील मातीचा ढिगारा काढण्यास गेल्या सभेत सांगितले होते; परंतु त्यावर अजून कार्यवाही झालेली नसून मग कशाला सभा घ्यायच्या, असा प्रश्‍न उपस्‍थित केला. यावर मुख्याधिकारी गारवे यांनी सभागृहातील ठरावांवर गांभीर्याने अंमलबजावणी होईल, असे सांगितले.

अतिक्रमणावर पुन्हा कारवाई

शहरातील अतिक्रमणावर पुन्हा कारवाई करण्याचा निर्णय सभागृहाने घेतला. तसेच अजून शहरातील खड्डे पूर्णपणे बुजवून झालेले नाहीत. जोवर सर्व प्रभागातील खड्डे बुजवत नाहीत, तोवर ठेकेदाराचे बिल काढू नये, असा ठराव घेण्यात आला. फडके उद्यानाचे काम वर्षानुवर्षे सुरू असून ते कधी संपणार, अशी नाराजी नगरसेवक राजू तोडणकर यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news