

राजापूर : तालुक्यातील पेंडखळे भवानी मंदिर परिसरात विजेच्या खांबावर काम करत असताना शॉक लागून मृत्यू झालेल्या कंत्राटी वायरमन अनिकेत परवडी यांच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून न्याय द्यावा, तसेच कुटुंबाला तातडीने 25 लाख रुपयांची आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला महावितरणमध्ये नोकरी द्यावी, अशा ठोस मागण्या करत तिथवली, धोपेश्वर गावांसह भू पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
अनिकेत परवडी हे गत आठवड्यात मंगळवारी पेंडखळे भवानी मंदिर येथे बंद असलेला वीजपुरवठा सुरू करण्याचे काम करत होते. ऑपरेटरकडून वीजवाहिनी बंद करून घेतल्यानंतर ते दुरुस्तीसाठी वीज खांबावर चढले होते. मात्र अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने त्यांना जोरदार शॉक बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत मृतदेह रुग्णालयातच ठेवला होता. पोलिसांनी मध्यस्थी करत ग्रामस्थ व महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल 22 तासांनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी राजापूर पोलिस ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र महावितरणचे वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहिल्याने सायंकाळी भू ग्रामपंचायत सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीला भू पंचक्रोशीसह तिठवली व धोपेश्वर पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी अनिकेत परवडी यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या ऑपरेटरवर कठोर कारवाई करावी, कुटुंबाला 25 लाख रुपयांची तातडी मदत द्यावी आणि कुटुंबातील एका व्यक्तीला महावितरणमध्ये नोकरीत सामावून घ्यावे, अशी जोरदार मागणी केली. या बैठकीत उपस्थित महावितरण अधिकाऱ्यांनी संबंधित ऑपरेटरला निलंबित करण्यात आल्याची माहिती देत ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीला महावितरणचे जिल्हा कार्यकारी अभियंता फुलपगारे, राजापूर अभियंता तांबोळी, पांडव यांच्यासह भाजप उपजिल्हाध्यक्ष अभिजित गुरव, माजी सभापती अभिजित तेली, पेंडखळे सरपंच राजेश गुरव, सामाजिक कार्यकर्ते संजय सरफरे, भू माजी सरपंच धनी तांबे, राजापूर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष विजय पाध्ये, विलास पाध्ये यांच्यासह तिठवली, धोपेश्वर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.