

खेड : तालुक्यातील बहिरवली मोहल्ला क्र. 1 येथे सुरू असलेल्या बंदर जेटी बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाबाबत ग्रामस्थांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, रत्नागिरी येथील मुख्य कार्यकारी अभियंत्यांना जागृत ग्रामस्थ व जमातीच्या अध्यक्षांच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की, जुनी जेटी धोकादायक बनल्यामुळे नवीन जेटीचे बांधकाम आवश्यक होते. मात्र जानेवारीपासून सुरू झालेल्या नव्या जेटीच्या कामामध्ये दर्जा आणि शासकीय निकषांचा अभाव दिसून येतो. ग्रामस्थांच्या मते मुख्य ठेकेदाराने दुसर्या ठेकेदारामार्फत काम सुरू केले असून, सिमेंट, स्टील यांचा वापर शासकीय मानकांप्रमाणे न करता काळ्या दगडावर थर दिला गेला आहे. या कामामुळे जेटीला ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून त्या केवळ सिमेंट-रेतीने बुजवण्यात येत आहेत. जेटीचे बांधकाम तळापासून न करता जुन्याच ढासळलेल्या जेटीवर केले गेले असून नवीन जेटीची उंचीही अपुरी असल्याने भरतीच्या वेळी पाणी जेटीवर येते.
या खराब कामामुळे बहिरवली ते कर्जी, पन्हाळजे, तसेच चिपळूण-करंबवणे येथे जाणार्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वयोवृद्ध, महिलांना जेटीवरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने चौकशी करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीकडे संबंधित यंत्रणांनी कारवाई करण्याची ग्रामस्थांची अपेक्षा आहे.