

जाकीरहुसेन पिरजादे
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात 1 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबरदरम्यान अवेळी, अवकाळी पावसामुळे भात, नाचणी, फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालाच्या अंदाजानुसार 170 गावातील 1098 शेतकर्यांचे 174.20 हेक्टर क्षेत्रावरील पिके मातीमोल झाली आहेत. त्यापैकी 172.14 हेक्टर क्षेत्रावरील भात पिकांना मोठा फटका बसला आहे. एकंदरीत 27 दिवसांत अंदाजे 15.76 लाखांचे नुकसान झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात चार महिन्यांत पावसाने दमदार बॅटींग केली. मे महिन्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे खरीपच्या पेरण्याला थोडा उशीर झाला होता. त्यानंतर जून महिन्यात पेरण्या झाल्या. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यात 55 हजार 551.40 हेक्टर क्षेत्रावर भात, नाचणी पिकांची पेरणी करण्यात आली. त्यापैकी सर्वाधिक पेरणी, लागवड भात पिकांची करण्यात आली होती. मात्र सप्टेंबर महिना संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात वादळी वार्यासह अवकाळी, अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील भात पिकांना मोठा फटका बसला.
शेतकर्यांकडून भात पिके कापून ठेवण्यात आली होती. सततच्या पावसामुळे कापलेली पिके भिजून गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. 1 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान 174.40 हेक्टर क्षेत्रावरील भात, नाचणी, फळपिके उद्ध्वस्त झाली आहेत. कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्याचे काम सुरू असून प्राथमिक अहवालानुसान तब्बल 15 लाखांहून अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईसाठी कृषी विभागाच्या वतीने प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.एकंदरित ऐन हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे कोकणातील शेतकर्यांचे डोळे पाणावले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
ऑक्टोबर महिन्यात अवेळी, अवकाळी पावसामुळे सर्वाधिक भात पिकांचे नुकसान झाले आहे. भात पिकांचे 172.14 हेक्टर, नाचणी 1.60 हेक्टर क्षेत्र, फळपिके 0.46 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पाऊस चांगला झाला होता. त्यामुळे भात पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली होती. पिके ही बहरली होती. यंदा उत्पादन वाढेल अशी परिस्थिती होती. मात्र मुसळधार पावसामुळे कापलेले भात पिक भिजून गेले. काही पिके आडवी झाली. भातसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले.