

Ratnagiri Bikes set on Fire
रत्नागिरी: शहरानजीकच्या पेठकिल्ला-भाटकरवाडा येथील अंगणात पार्क करुन ठेवलेल्या तीन दुचाकी अज्ञाताने जाळून तब्बल 1 लाख 95 हजारांचे नुकसान केले. ही घटना गुरुवारी रात्री 12.30 ते शुक्रवारी पहाटे 4.30 वा. कालावधीत घडली आहे. या प्रकारामुळे पेठकिल्ला परिसरात एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत निहाल मकसूद मुल्ला (वय 36, रा. भाटकरवाडा पेठकिल्ला, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री घरा बाहेरील अंगणात 20 हजार रुपयांची काळ्या रंगाची अॅक्सेस (एमएच-08-एसी-3509) तसेच तहा इम्तीयाज मिरकर यांची 1 लाख 50 हजारांची बुलेट दुचाकी (एमएच-09-एफएस-9000) आणि फजल इस्माईल मिरकर यांच्या मालकीची 20 हजारांची अॅक्टिव्हा दुचाकी (एमएच-08-जे-5020) अशा तीन दुचाकी पार्क केल्या होत्या.
अज्ञातांनी तीन दुचाकी जाळून टाकल्या. यात 1 लाख 95 हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच संशयित आरोपींनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने घटनास्थळाच्या बाजुलाच असलेल्या एका जुन्या बॅनरवर एक मजकूर लिहून आगळिक केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश शिवरकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर सकाळी पोलिसांनी पेठकिल्ला परिसरात रुट मार्च करुन नागरिकांना शांत राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले. या घटनेमागे नेमके काय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वैमनस्यातून हा प्रकार घडला आहे की, अन्य काही कारण आहे, हे समजू शकलेले नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शितल पाटील करत आहेत.
अज्ञात व्यक्तीने दुचाकी जाळल्या आहेत. सर्व तपास करून आरोपींचा शोध घेतला जाईल. लवकरच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
- नितीन बगाटे, जिल्हा पोलिस अधीक्षक