खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कशेडी येथील ओझरवाडी परिसरात बोलेरो पिकअपच्या धडकेत एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. २० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअप (क्र. MH ०८ BK ०९५४) वरील चालकाने कशेडी, ओझरवाडी येथे एका व्यक्तीला जोरदार धडक दिली. या अपघातात संबंधित व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी खेड पोलिसांनी तालुक्यातील सर्व पोलिस पाटलांना माहिती कळवण्याचे आवाहन केले आहे. संबंधित व्यक्ती आपल्या गावातील किंवा परिसरातील आहे का, याबाबत खातरजमा करून ओळख पटल्यास नातेवाईकांसह तातडीने खेड पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून ओळख पटवण्यासाठी मृतदेह राखून ठेवला आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी खेड पोलिस ठाण्याचे श्रेणी पोलिस उपनिरीक्षक उदय भोसले (मो. ९१३०३३४६१६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.