

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावरील उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाखालून आजूबाजूच्या गावांसाठी काढण्यात आलेले अंडरपास मार्ग आणि काही ठिकाणचे बोगदे हे गेले काही महिने वाहनांसाठी पार्किंग झोन बनले आहेत. बर्याच वेळा तेथे दीर्घकाळ उभ्या असलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे तेथून ये-जा करणार्या वाहनांना अडथळे ठरत असून, त्यातून अपघातांचे धोके वाढत असतानाच कायदा सुव्यवस्था मात्र त्याकडे जातीनिशी लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्याच्या कार्यक्षेत्रात वाटुळपासून पुढे येरडव फाटा, ओणी बाजारपेठ, राजापूर पेट्रोलपंप परिसर, हातिवले आदी ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले असून त्या खालून आजूबाजूच्या गावांकडे दैनंदिन रहदारीसाठी कायमस्वरूपी अंडरपास मार्ग काढण्यात आले आहेत. मात्र, त्या पुलांखाली बर्याचवेळा अनेक वाहने उभी केली जात असून त्यामुळे वाहनांची मोठी गर्दी तेथे पाहायला मिळते.
तालुक्यात ओणीमधील पाचल, येरडव फाट्यावर तर डंप, ट्र्क यासह सर्व प्रकारची वाहने तर दीर्घकाळ पार्क केलेली पाहावयास मिळतात. वाहनांच्या दुरुस्तीचा व्यवसायदेखील तेथे सुरु करण्यात आला आहे. बर्याचवेळा तर काही मोठी वाहने तर एका रेषेत उभी असतात. त्यामुळे महामार्गावरुन किंवा आजूबाजूच्या परिसरातून आलेल्या वाहनांना अडथळे ठरत आहेत. बर्याच वेळा अचानक आलेल्या वाहनांची तेथे उभ्या असलेल्या वाहनांना धडक बसून अपघात होण्याचा धोकादेखील असतो. यापूर्वी एक दोन वेळा असे प्रकार घडले होते. मात्र, ते अपघात किरकोळ होते. सुदैवाने फारसे नुकसान झाले नव्हते.
उड्डाणपुलाखालील रस्त्यावर काही वाहने तर गेले अनेक दिवस मालकीचे क्षेत्र असल्याप्रमाणे पुलाखाली उभी आहेत. त्या पुलाखाली वाहनांच्या दुरुस्तीचे काम देखील होते. त्यामुळे अलीकडे हा उड्डाणपूल म्हणजे विना परवाना वाहन तळच बनविण्यात आला आहे. तसेच प्रकार राजापूर पेट्रोलपंपाजवळच्या उड्डाणपुलाखाली पाहावयास मिळतो तेथे सुद्धा प्रदीर्घकाळ वाहने उभी असतात. केवळ उड्डाणपुलच नाही, तर जे पादचार्यांसाठी बोगदे काढण्यात आले आहेत त्याचाही वापर दुचाकी गाड्या पार्किंगसाठी केला जात आहे. त्यामुळे तेथून वाट काढीत जावे लागते, असे अनेकवेळा घडते. महामार्गावरील उड्डाणपुलांसह काढलेल्या बोगद्यांचा वापर विनापरवाना वाहन तळासाठी होत असताना व वाहतुकीच्या दृष्टीने ते धोकादायक ठरत असताना त्या विरोधात कोणतीच कृती वा कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे जनमाणसांतून संताप व्यक्त केला जात आहे. एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे का, असे खडे सवाल उपस्थित केले जात आहेत.