Ratnagiri News : परवाना नसतानाही पर्ससीन मासेमारी; चार नौका ताब्यात

१२ नॉटिकल मैलांच्या आत काळबादेवीसमोर कारवाई; तीन नौका मिरकरवाड्यातील
Konkan Fishing
Konkan FishingFile Photo
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : पर्ससीन मासेमारीचा हंगाम सुरू होऊन अवघे पाच दिवस होत असतानाच राज्याच्या सागरी हद्दीत म्हणजेच १२ नॉटिकल मैलांच्या आत बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्या चार मिनी पर्ससीन नौका मत्स्य विभागाच्या गस्ती पथकाच्या हाती लागल्या आहेत. काळबादेवी किनाऱ्यापासून अवघ्या ४ ते ५ नॉटिकल मैलांवर मासेमारी करणाऱ्या या नौकांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी तीन नौका मिरकरवाड्यातील तर एक काळबादेवी येथील आहे. या कारवाईमुळे पर्ससीन मासेमारी सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवसांपासून राज्याच्या सागरी क्षेत्रात बेकायदा मासेमारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथकाने ही कारवाई केली. ‘शारदा’ गस्ती नौकेद्वारे समुद्रात गस्त सुरू असताना काळबादेवीसमोर या चार मिनी पर्ससीन नौका मासेमारी करताना आढळून आल्या. काळबादेवी किनाऱ्यापासून ४ ते ५ नॉटिकल मैलांवरच मासेमारी करणाऱ्या या नौकांविरोधात आयुक्तांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.

तीन नौका मिरकरवाड्यातील

मिरकरवाड्यातील सर्फराज नजीर पावसकर यांची रिया-सारिया, अस्लम हसन दर्वे यांची उबेदुल्ला अदनान आणि मुस्सदीक अब्दुल हमीद जयगडकर यांची आयरा झैनाब, तर काळबादेवी येथील धनंजय बिर्जे यांची ध्रुवी या चार नौका कारवाईत सापडल्या. पर्ससीन नेट मासेमारीला १ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. सुमारे ३०५ पर्ससीन नौकांना ॲक्सेस पास देण्यात आले असून त्यांना राज्याच्या १२ नॉटिकल मैलांच्या बाहेरच्या समुद्रात मासेमारी करण्याची परवानगी आहे.

‘समुद्रातील मासेमारीवर मत्स्य विभागाचे पूर्ण लक्ष असून अवैध मासेमारी करणाऱ्यांना कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही.
- जे. डी. सावंत, आयुक्त, सहायक मत्स्य व्यवसाय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news