Uday Samant| महायुतीतील वाद दोन्ही बाजूंनी थांबवा!

आमदार महेंद्र दळवी, खासदार सुनील तटकरे यांच्यातील संघर्षावर उदय सामंत यांची मध्यस्थीची भूमिका
Uday Samant
Uday SamantPudhari
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे निर्माण होणारी दरी भरून काढण्याची गरज आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी केलेले वक्तव्य हे शिवसेनेचे अधिकृत वक्तव्य नाही. महायुतीत असताना अशा प्रकारची विधाने करणे योग्य नाही. मात्र, केवळ एका बाजूने थांबून उपयोग नाही, दोन्ही बाजूंनी वाद थांबवले पाहिजेत, अशी स्पष्ट भूमिका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना मांडली. या वादासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्याशी आपले बोलणे झाले असून, शिंदे यांनी दोन्ही आमदारांना समज दिल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार महेंद्र दळवी आणि खासदार सुनील तटकरे यांच्यातील संघर्ष पूर्वीपासूनचा आहे. मात्र, त्याने महायुतीला अडचण निर्माण होऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही टोकाची भूमिका घेऊ नये. महाविकास आघाडीला आपल्या अंतर्गत वादाचा फायदा होणार नाही, अशा पद्धतीने सर्वांनी वागावे, असे आवाहन सामंत यांनी केले.

‘ऑपरेशन टायगर’ची वेळ लवकरच सांगू‘

‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर बोलताना सामंत यांनी जनतेच्या आशीर्वादाने आमचा पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे गटात आपण असताना चांगले होतो, अशी टीका संजय राऊत करतात. मात्र, ‘ऑपरेशन टायगर’ हे नावही राऊत यांच्याकडूनच आले आहे. ऑपरेशन नक्की आहे, त्याची वेळ आणि तारीख योग्यवेळी जाहीर करू, असे सूचक विधान त्यांनी केले.

विलीनीकरणाचा परिणाम नाही

प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विलीनीकरणाच्या वक्तव्यावर सामंत म्हणाले, अद्याप विलीनीकरण झालेले नाही. एनडीएमध्ये एकनाथ शिंदे हे तिसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने व कामाने आपले स्थान सिद्ध केले आहे. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चेचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा अर्थ कसा घ्यायचा, तसेच त्यांच्या पाठिंब्याबाबत काय निर्णय घ्यायचा, हे दिल्लीतील नेतृत्व ठरवेल, असे ते म्हणाले.

प्रत्येकाला पक्षवाढीचा अधिकार

सामंत म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी नेते काही विधाने करतात. मात्र, आमदार कोणाला करायचे, हे एकनाथ शिंदे ठरवतील. सुनील तटकरे यांना खासदार करण्यात आम्ही काम केले, असे सांगतानाच महायुतीतील नेत्यांनी परस्परांवर टीका करताना विरोधकांना संधी मिळणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जरांगे ऑडिओ क्लिपची एसआयटी चौकशी

मनोज जरांगे यांच्या कथित ऑडिओ क्लिपबाबत बोलताना सामंत यांनी एसआयटी चौकशीतून दूध का दूध, पाणी का पाणी होईल, असे सांगितले. या चौकशीतून आणखी काही सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.