

चिपळूण : ट्रेड विथ जॅझ (टीडब्ल्यूजे) कंपनीविरोधात यवतमाळ जिल्ह्यात 39 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यातील ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत. या कंपनीमध्ये अनेकांनी कोट्यवधी रुपये जास्त परतावा मिळतो म्हणून गुंतविले आहेत. मात्र, आता आपले पैसे मिळणार की बुडणार या विवंचनेत अनेकजण आहेत.
टीडब्ल्यूजे कंपनीविरोधात शनिवारी अवधूतवाडी (जि. यवतमाळ) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह कोकणात एकच खळबळ उडाली आहे. राज्यभरात या कंपनीच्या शाखा असून हजारो कोटींचा हा स्कॅम असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील अवधूतवाडी पोलिस ठाण्यात टीडब्ल्यूजेचे सीएमडी समीर नार्वेकर (पुणे), संचालक नेहा समीर नार्वेकर (पुणे), विभागीय व्यवस्थापक सागर मंचलवार (रा. संभाजीनगर), शाखा व्यवस्थापक सूरज मडगुलकर (यवतमाळ), लेखापाल नम्रता सूरज मडगुलकर अशा पाचजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यवतमाळ अंबिकानगर येथील गजेंद्र श्रावण गणवीर (55) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार गणवीर यांनी त्यांचे जावई ओमप्रकाश खांडेकर (रा. अमरावती) यांनी टीडब्ल्यूजे कंपनीमध्ये 10 लाखांची गुंतवणूक केली होती. त्यामुळे जावयावर विश्वास ठेवून सासरे गजेंद्र गणवीर यांनीदेखील 14 लाखांची गुंतवणूक केली. त्यांचा लहान भाऊ सदानंद यांनी आणखी 5 लाख गुंतविले. या शिवाय विरेंद्रसिंह चव्हाण यांनीही 10 लाख रूपये गुंतविले. अशी एकूण 39 लाखांची गुंतवणूक या कंपनीत केली होती. या गुंतवणुकीतून संबंधित कंपनीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे युनियन बँक ऑफ इंडिया शाखेत नियमित व्याज जमा होत होते. मात्र, 2025 पासून व्याज मिळणे बंद झाले. त्यामुळे गणवीर यांना कंपनीकडून? ? तांत्रिक अडचण सांगण्यात आली व एप्रिलपासून व्याज मिळेल, असे सांगितले. मात्र, वारंवार चौकशी करूनदेखील पैसे मिळत नसल्याचे आपण फसलो गेलो की काय? अशी शंका निर्माण झाली.
यावेळी गुंतवलेले पैसे परत द्या, असे सांगितले असता टीडब्ल्यूजेच्या यवतमाळ शाखा व्यवस्थापकाने, सिंगापूर बँकेकडून कर्ज घेतले आहे. ते मिळाले की पैसे देतो, असे आश्वासन दिले. मात्र, त्यालाही चार महिने उलटल्यानंतर पैसे मिळत नसल्याने अखेर सात गुंतवणूकदार पुणे येथील बाणेरच्या कार्यालयात गेले व समीर नार्वेकर यांची भेट घेतली असता त्यांनी पुढील तारीख दिली. ऑगस्टमध्ये पैसे मिळतील असे सांगण्यात आले व सातत्याने तारीख पे तारीखचे आश्वासन सुरू झाले. अखेर आपण फसल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पाचजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
टीडब्ल्यूजे कंपनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जास्त परतावा देते, असे सुरुवातीला सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यात 1 लाखाला महिन्याला 7 टक्के, नंतर 6, काही महिन्यांनी 5, त्यानंतर 4 व 3 टक्के दराने व्याज गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होत होते. सुरुवातीच्या काळात काही गुंतवणूकदारांनी दामदुप्पट फायदा देखील घेतला व आपली गुंतविलेली रक्कमदेखील वसूल केली. हा विश्वास बसल्याने टीडब्ल्यूजेमध्ये गुंतवणूक करणार्यांचा ओढा वाढला व गुंतवणूक मोठी होत गेली. त्यामुळे हजार ते बाराशे कोटी रूपयांचा हा गैरव्यवहार असल्याचे बोलले जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी आपले पैसे टीडब्ल्यूजेमध्ये गुंतविले आहेत. मात्र, आता संबंधित कंपनीच्या सीएमडीवर गुन्हा दाखल झाल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. कंपनीच्या टीडब्ल्यूजे इव्हेंट, टीडब्ल्यूजे इन्फ्रा, टीडब्ल्यूजे हॉस्पिटॅलिटी, टीडब्ल्यूजे लर्निंग, टीडब्ल्यूजे लॉजिस्टीक अशा विविध उपकंपन्या आहेत. येथेही गुंतवणूकदारांचा पैसा गुंतविला जातो आणि त्यातून मिळणार्या नफ्यातून मासिक तीन ते चार टक्के रक्कम व्याज दिले जाते, असे आमीष लोकांना दाखविण्यात आले होते. या आमिषाला भुलून काहींनी कोटी तर काहींनी लाखात रक्कम या कंपनीत गुंतवली आहे. आता मात्र या सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.
टीडब्ल्यूजे कंपनीने आपला विस्तार राज्यभर केलेला आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत. यामध्ये नवी मुंबई खारघर, ठाणे, माणगाव, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, सांगली, खर्डी-पुणे, चिपळूण, रत्नागिरी, शृंगारतळी व राज्यात अन्य ठिकाणी देखील या कंपनीने आपल्या शाखा थाटल्या होत्या. भाड्याने कार्यालये घेऊन कार्पोरेट कार्यालय थाटले होते. त्यामुळे लोकांनी या कंपनीवर विश्वास ठेवून कोट्यवधीची गुंतवणूक केली होती. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून परतावा होत नसल्याने लोकांचे धाबे दणाणले आहेत तर दुसर्या बाजूला कंपनीकडून तारीख पे तारीख मिळत आहे.
टीडब्ल्यूजे कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी गुंतवणूक केली आहे, अशी माहिती पुढे येत आहे. चिपळूण पोलिस ठाण्यात गेल्या तीन-चार महिन्यांपासून काहींनी तक्रारी केल्या होत्या. मात्र, या तक्रारींची दखल आजपर्यंत घेण्यात आलेली नाही. याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे संबंधित तक्रारदारांना वेळोवेळी सांगण्यात आले. मात्र, आजपर्यंत जिल्ह्यात कोठेही या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार हवालदिल झाले असून, हजार ते दान हजार अधिकारी व कर्मचार्यांनी या कंपनीत आपले पैसे गुंतविले आहेत. 1 लाखापासून 60 लाखांपर्यंत गुंतवणुकीच्या रकमा आहेत. पोलिस या कंपनीवर विश्वास ठेवून गुंतवणूक करीत होते. त्यामुळे सर्वसामान्य लोकही या जाळ्यात ओढले गेले. आज मात्र त्यांच्यावर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.