रत्नागिरी : कुंभार्ली घाटात मध्यरात्री ट्रक बंद पडून वाहतूक ठप्प
चिपळूण : चिपळूण - कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात ट्रक बंद पडल्याने घाटातील वाहतूक तब्बल आठ ते दहा तास ठप्प पडली. यामुळे कुंभार्ली घाटात वाहनांची मोठी रांग लागली होती. या अपघातामुळे सुमारे आठ ते दहा तास प्रवासी अडकून पडल्याने मोठी गैरसोय झाली.
शनिवारी सकाळी बंद पडलेला ट्रक क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. कुंभार्ली घटात वळणांच्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अनेक अपघात होत आहेत. मात्र, त्याकडे बांधकाम विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. पावसाळा संपला तरी या खड्ड्यांची दुरुस्ती केली गेलेली नाही. यामुळे घाटात अनेक अपघात होत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कुंभार्ली घाटामध्ये ट्रक बंद पडल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली.
रात्री 1 वाजता वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांना घाटात रात्र थंडीत जागून काढावी लागली. दरम्यान, शनिवारी सकाळी हा ट्रक रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

