

रत्नागिरी : जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ मिळावे या उद्देशाने शासनाने “स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना” सुरू केली आहे. राष्ट्रीयकृत बँकांमार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेद्वारे छोट्या व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तृतीयपंथीयांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लघु कर्ज योजनेतून २५ हजार रुपये, मध्यम कर्ज योजनेतून ५० हजार रुपये तर दीर्घ कर्ज योजनेतून तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य मिळणार आहे. या योजनेत व्यवसायासाठी आवश्यक भांडवलापैकी ५ टक्के रक्कम लाभार्थ्याने स्वतः भरायची असून ४५ टक्के रक्कम शासन अनुदानाच्या स्वरूपात दिली जाणार आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम कर्जाच्या स्वरूपात दिली जाईल.
या कर्जासाठी कोणत्याही जामीन किंवा तारणाची आवश्यकता नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा १८ ते ५० वयोगटातील असावा तसेच दहा वर्षांचा रहिवासी असल्याचे अधिवास प्रमाणपत्र आणि सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले तृतीयपंथी ओळखपत्र आवश्यक आहे. अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही बीज भांडवल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जासोबत ओळखपत्र, रहिवासी पुरावा, व्यवसायाचा परवाना, व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्याचे कोटेशन, जागेचा ७/१२ उतारा किंवा भाडेकरारनामा, ना हरकत प्रमाणपत्र तसेच दोन छायाचित्रे जोडणे आवश्यक असल्याचे आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबांव येथे संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.