

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी आरे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या दहिसर-मुंबईतील पर्यटक कुटुंबाला मारहाण व शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी देणाऱ्या चार संशयितांच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
२ मे रोजी आरे येथील समुद्रकिनारी दहिसर येथून प्रविण हरिश्चंद्र कोरे (४८, रा. मीठाघर रोड कांदरपाडा दहिसर पश्चिम मुंबई) हे कुटुंबियांसह रत्नागिरीत पयर्टनास आले होते. ते आरे समुद्रकिनारी जातना कार (एमएच-४६-डीए-९७८४) व कार (एमएच-४६-सीई-७४८५) मधील चार अज्ञातांनी फिर्यादीच्या गाडीसमोर आपल्या गाड्या चालवून त्यांना पुढे जाण्यासाठी अडथळा केला होता. त्यानंतर चारही संशयितांनी फिर्यादी व कुटुंबियांना शिवीगाळ केली. फिर्यादीने त्यांना जाब विचारला असता फिर्यादीसह त्यांच्या पत्नी व पुतण्याला मारहाण करत चाकू दाखवून ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या आदेशाने रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक पनवलेला पाठवून चार संशयित आरोपींना ४८ तासांत पनवेलमधून ताब्यात घेतले. ही कारवाई ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलिस उपनिरीक्षक अभय तेली, पोलिस काँस्टेबल अजिंक्य पवार यांनी केली आहे.