Ratnagiri News : जलवाहतुकीमुळे जिल्ह्यासह कोकणचे वाढणार पर्यटन

हाऊसबोटीमुळे गुहागर तालुक्याचे महत्त्व वाढले; पर्यटनावर आधारित उद्योग, व्यवसायात होणार वाढ; व्यावसायिक खूश
Ratnagiri News
जलवाहतुकीमुळे जिल्ह्यासह कोकणचे वाढणार पर्यटन
Published on
Updated on

गुहागर शहर : बाल्टिक समुद्रावरून अत्याधुनिक बोटी लवकरच जलवाहतुकीसाठी आणण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यातच आता गुहागरनजीकच्या दाभोळ बंदरात हाऊसबोट सुरू झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणचे जलपर्यटन वाढणार असून पर्यटनाच्या द़ृष्टीने गुहागरचे महत्त्व अधिक वाढणार असून पर्यटकांवर अवलंबून असलेल्या येथील उद्योग, व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोकणाच्या जल पर्यटनाला एक नवा आयाम देत दापोलीचे माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल यांची भव्य हाऊसबोट दाभोळ खाडीमध्ये दाखल झाली आहे. विशेष म्हणजे या हाऊसबोटमध्ये 8 खोल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने खोल्या असलेली ही महाराष्ट्रातील पहिली हाऊसबोट असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कोकणच्या जलपर्यटनाला एक आलिशान अनुभव मिळणार आहे. कोकणातील खाड्या बोटीच्या माध्यमातून जोडून डॉ. मोकल यांनी यापूर्वीच कोकणच्या पर्यटन क्षेत्रात वेगळी क्रांती केली आहे. आता सुवर्णदुर्ग शिपिंगच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी अत्याधुनिक हाऊसबोटमुळे पर्यटकांना दाभोळ खाडीचं शांत आणि नयनरम्य सौंदर्य, जैवविविधता, कांदळवन जवळून अनुभवता येणार आहे. तसेच कोकणी खाद्य पदार्थांची चवही चाखता येणार आहे. साहजिकच केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण कोकणात जलपर्यटन वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दाभोळ हे दापोली तालुक्याचे किनारपट्टी भागातील शेवटचे टोक आहे. मात्र, सर्वाधिक या खाडीचा परिसर गुहागरला लागून आहे. दाभोळला उपसागर असेही म्हणतात. दाभोळ हे ऐतिहासिक बंदर असून खाडीच्या मुखाजवळ आहे. या खाडीच्या किनार्‍यावर किल्ले, ऐतिहासिक बंदरे, ऐतिहासिक मंदिरे, ऐतिहासिक गुहा, गरम पाण्याचे झरे, जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती कारखाने, नैसर्गिक संसाधने, पर्यटन, दाभोळ पॉवर कंपनी, कोकण एलएनजी, वीज निर्मिती आणि वायू प्रकल्प, यांत्रिक आणि अयांत्रिक मासेमारी, मुंबई ते कोकण रो-रो सेवेसाठी जेट्टी आणि भविष्यातील सागरी महामार्ग व खाडीवर पूल होण्याची शक्यता आहे, या सर्व गोष्टींमुळे दाभोळखाडीला अनन्य साधारण महत्त्व आहे.

सुमारे 50 वर्षांपूर्वी मुंबईतून गोवा प्रवासी जलवाहतूक सुरू होती. त्यावेळी उतरण्याचे दाभोळ हा सागरी थांबा होता. काही काळाने ही जलवाहतूक बंद झाली. मात्र, दाभोळचे महत्त्व कधीही कमी झाले नाही. अगदी एन्रॉन प्रकल्पापासून ते आजपर्यंतच्या बहुचर्चित आरजीपीपीएल प्रकल्पामुळे दाभोळ हे देशभरात नावलौकिक प्राप्त झालेले बंदर आहे. अशा दाभोळ खाडीत आता जलवाहतूक सुविधा सुरू झाली आहे. आता मुंबई ते गोवा अशी जलवाहतूक कायम सुरू झाल्यास दाभोळचे महत्त्व वाढणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक पर्यटक दापोली, गुहागर, गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी येतात. जलवाहतुकीमुळे पर्यटकांना एकाचवेळी या सागरी मार्गातून बोटीने प्रवास करता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news