

चिपळूण : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरांटो पॉवर प्लॅन्टसाठी तब्बल ६०० एकरमध्ये वृक्षतोड होणार आहे. याला स्थानिक व आदिवासी लोकांकडून जोरदार विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर टोरांटो कंपनीने चिपळूण परिसरातील सह्याद्रीच्या रांगेत वृक्षारोपणासाठी सर्वेक्षण केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तब्बल ६०० एकर जागेवर संबंधित कंपनीने वृक्षारोपणासाठी सर्व्हे केला. मात्र, या सर्वेक्षणात त्यांना यश आलेले नाही.
सद्यस्थितीत टोरांटोच्या प्रकल्पाला जोरदार विरोध होत आहे. कारण या ठिक़ाणी असणार्या ६०० एकर जमिनीवरील झाडे तोडली जाणार आहे. शासकीय आकडेवारीनुसार ४० हजार झाडांची तोड होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात हा आकडा लाखोंच्या पटीत असल्याचे बोलले जात आहे. या विरोधात ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनीदेखील उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सह्याद्रीच्या कुशीत ६०० एकर जमिनीवर झाडे लावण्यासाठी या कंपनीने आपला मोर्चा रत्नागिरी जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात वळविला होता.
त्या दृष्टीने स्थानिक पातळीवर टोरांटो कंपनीच्या माध्यमातून सर्वेक्षणदेखील करण्यात आले. या कामासाठी अनेक दलाल देखील तयार झाले. कंपनीच्या प्रतिनिधींना येथील जमिनी दाखविण्यात आल्या व प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि संबंधित दलालांनी ही प्रकरणे पूर्ण करण्यासाठी दहा टक्के मोबदलादेखील घेतला. मात्र, मोबदला देऊनदेखील टोरांटो कंपनीला जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यातील जागा अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे या प्रतिनिधींनी वृक्षारोपणासाठी आवश्यक असलेल्या जागेचा शोध घेण्याऐवजी आता येथून गाशा गुंडाळला आहे, असे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र, यातील काही दलालांनी मात्र चांगलाच हात मारला आहे. याची चर्चा सह्याद्रीपट्ट्यात जोरदार सुरू आहे. जर संबंधित कंपनीला सह्याद्रीपट्ट्यात ६०० एकर जागा मिळाली असती तर वन विभागाच्या वनक्षेत्रात वाढ झाली असती आणि ग्रीन कव्हरमध्येदेखील अधिक वाढ झाली असती.