

रत्नागिरी: उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात एचएसआरपी बसवण्याच्या मोहिमेत रत्नागिरीकर सर्वात पुढे आहे. जिल्ह्याने आघाडी घेतली असून नोंदणीकृत असलेल्या 2 लाख 11 हजार 423 वाहनांपैकी 1 लाख 15 हजार 534 वाहनांवर एचएसआरपी नंबर बसवण्यात आल्या आहेत तर 24 हजार 74 वाहनांनी नंबर प्लेट बुकींग केली आहे.एकंदरीत,एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यात रत्नागिरी राज्यात अव्वल ठरले असल्याचे सांगण्यात आले.
उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट वाहनांची सुरक्षा वाढते आणि गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. यामुळे राज्याच्या परिवहन विभागाने 1 एप्रील 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट सक्तीची करण्यात आली आहे. राज्यभरात पहिली मुदत दिली होती. मात्र कमी प्रतिसाद मिळाला असून पुन्हा दुसर्यांदा 30 नोव्हेंबरपर्यंत नंबरप्लेट बसवण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.2019 पूर्वी नोंदणी झालेल्या एकुण वाहनांची संख्या 2 लाख 11 हजार 423 इतकी आहे. यापैकी एचएसआरपी बसविण्यासाठी दीड लाखांहुन अधिक वाहनांनी 27 केंद्रावर बुकींग केली आहे. त्यापैकी 1 लाखा 15 हजार 564 वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यात आल्या आहेत. उर्वरित जे वाहनधारकांनी अद्याप नंबरप्लेटबसवली नाही त्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे.भविष्यात वाहनांची मालकी हस्तांरण, पत्ता बदल, वित्तबोजा चढविणे अथवा उतरविणे, विमा अद्यावत करणे आदीसाठी एचएसआरपी नंबर बसविणे अनिवार्य केले जावू शकते, याची नोंद वाहनधारकांनी घ्यावी, वेळेत न बसवल्यास 1 हजार ते 5 हजारांपर्यंत दंड घेण्यात येणार आहे.
सुरूवातीला जिल्ह्यासाठी चिपळुण, खेड आणि रत्नागिरी अशा तीन शहरांमध्येच नंबर प्लेट बसविण्यासाठी केंद्रे निश्चित करण्यात आली होती. आता 27 नंबर प्लेट केंद्रे सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. .
30 नोव्हेंबरच्या आत ज्या वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवली नाही. अशांवर 1 डिसेंबर 2025 पासून एचएसआरपी न बसविणार्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशी कारवाई करण्यात येणार आहे. वाहनमालकांच्या वाहनांची पुननोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण इ. सर्व कामे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून थांबविण्यात येतील. वायुवेग पथकामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना एचएसआरपी लावल्याशिवाय सोडण्यात येणार नाही.
- दुचाकी, ट्रॅक्टर- 450 रुपये
- तीनचाकी- 500 रुपये
- इतर सर्व वाहनांना- 745 रुपये