चिपळूण : महाराष्ट्राची समृद्ध ग्रामीण संस्कृती, प्रगत शेती तंत्रज्ञान आणि सहकार चळवळीचा वारसा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेच्या वतीने येत्या 14 व 15 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यस्तरीय ‘ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहित्याच्या माध्यमातून शेतकरी आणि सामान्य नागरिकांना वैचारिक दिशा देण्याचा प्रयत्न या संमेलनाद्वारे केला जाणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक आणि कृषीभूषण तानाजीराव चोरगे भूषविणार असून, स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय जी. भावे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी दिली.
या संमेलनाला दिग्गजांची उपस्थिती लाभणार असून, दोन दिवस चालणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि ज्येष्ठ साहित्यिक मा. सदानंद मोरे यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.संमेलनाचे वैशिष्ट्यया संमेलनात ग्रामीण जीवन, कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग आणि सहकार चळवळीचे महत्त्व यावर आधारित नामवंत लेखकांची व्याख्याने, चर्चासत्रे आणि परिसंवाद होणार आहेत. तसेच, येथे भव्य पुस्तक प्रदर्शन देखील भरवण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी, साहित्यिक, कृषी तज्ज्ञ आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. ग्रामीण भागातील कथाकार, कादंबरीकार आणि कवींच्या साहित्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश असल्याचे संमेलनाचे उपाध्यक्ष अरुण इंगवले यांनी सांगितले.
कोकणातील शेतीच्या समस्या, तरुणांची शेतीकडे फिरणारी पाठ, जिल्ह्यातील रोजगाराच्या शोधात बाहेर जाणार तरुण, कृषी पर्यटनातून उत्पन्नाची साधने यांसह विविध विषयांवर याठिकाणी चर्चा होणार आहे. येथील शेतकरी शेतीच्या कर्जबाजारातून कधीही आत्महत्या करीत नाही. अनेक संकटांचा सामना करीत शेतीवर गुजरान करीत असतो. कृषी संसाधने व शेती आधारीत विविध उत्पादने यावरही चर्चा होणार असून, तरुणांनी शेतीपुरक व्यवसायाकडे वळावे यासाठीही मार्गदर्शने होणार आहेत. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, ॲड. दीपक पटवर्धन, जयवंत जालगावकर, गजानन पाटील, संदीप राजपूरे, धीरज वाटेकर, राजू सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष प्रकाश देशपांडे, उपाध्यक्ष अरुण इंगवले , कोषाध्यक्ष अजय चव्हाण यांच्यासह वसंत सावंत, उदय वेल्हाळ इतर सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार
या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्रजी पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच, संमेलनाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.