

रत्नागिरी : एमआयडीसीने रत्नागिरी शहर दत्तक घेतले आहे. साडेचारशे कोटी रुपये दिले आहेत. येत्या दोन वर्षांत स्मार्ट शहर म्हणून रत्नागिरी शहर उभे राहणार आहे. आधुनिकद़ृष्ट्या, सकारात्मकद़ृष्ट्या रत्नागिरी पुढे जात आहे, असे सांगून डोळस पद्धतीने पहा, चांगली कामे निश्चित दिसतील, त्यावर चर्चा करा, असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले.
एमआयडीसी विशेष निधीमधून स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नगर? परिषदेच्या दामले विद्यालय नूतन इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते रविवारी झाले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, ‘डाएट’चे प्राचार्य सुशील शिवलकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, न. प. चे मुख्याधिकारी तुषार बाबर, भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, डॉ. शिरीष शेणई, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. दिलीप धारिया, अॅड. फजल डिंगणकर, डॉ. सुमेधा करमरकर, आनंद फडके, राहुल पंडित, बिपिन बंदरकर, शिल्पाताई सुर्वे आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, राज्यात नावारुपाला आलेल्या दामले विद्यालयात पहिली ते दहावीला असणार्या वर्गात 1300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याचा सर्वांना अभिमान असला पाहिजे. राज्यात अन्य शाळांची परिस्थिती पाहिल्यास दामले विद्यालयात प्रवेशासाठी रांगा लागतात, त्याबद्दल पालकांना धन्यवाद देतो आणि इथल्या शिक्षकांचे कौतुक करतो. एमआयडीसीने दिलेल्या 15 कोटी 38 लाख रुपयांमधून खासगी शाळांपेक्षाही सुंदर, टुमदार इमारत राज्यात नगर परिषदेच्या शाळेची म्हणजे दामले विद्यालयाची होत आहे. खासगी शाळांसारख्या चांगल्या सुविधा शासकीय शाळांसाठी दिल्यास, विद्यार्थी येवू शकतात. ही सुरुवात रत्नागिरीतून झालेली आहे. ही शाळा राज्यात आदर्श ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
स्मार्ट शहरासाठी एमआयडीसीने दिलेल्या साडेचारशे कोटी रुपयांमधून दर्जेदार चांगली कामे नगर परिषदेने कंत्राटदाराकडून करुन घ्यावीत, असे सांगून पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, राज्यातील सुंदर शहर असणार्या बारामतीतील लोक आपले शहर पहायला येतील, असे मी सांगितले होते. नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा रत्नागिरीत येवून गेले. इथे झालेली कामे पाहून गेले. असे प्रकल्प राज्यात उभे करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. गेल्या तीन वर्षात राज्यात जीडीपी वाढविण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. रत्नागिरी पर्यटन जिल्हा असल्याने हजारो पर्यटक इथे भेट देत आहेत.? ? भविष्यात जीडीपी वाढीत राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी हा एक जिल्हा असेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मुख्याध्यापक भगवान मोटे यांनी प्रास्ताविक केले. इस्त्रोला जायला संधी मिळालेल्या पाच विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना पुष्पगुच्छ देवून धन्यवाद दिले. सई जाधव या विद्यार्थींनीने इस्त्रो भेटीचा अनुभव सांगितला. याचवेळी ना. सामंत यांनी माळनाका येथील व्यायामशाळा आणि दवाखान्याच्या इमारतीचे भूमिपूजन झाल्याचेही जाहीर केले.