Ratnagiri Crime : महिलेच्या गळ्यातील लाखाचे मंगळसूत्र लंपास

भेंडीचे दोर काढण्याचा बहाणा करून विळा मागितला अन्‌ चोरट्याने ठोकली धूम
Gold Theft
वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले.Pudhari Photo
Published on: 
Updated on: 

देवरूख : देवरूख पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या वांझोळे बुद्रुक गवळीवाडी येथे एखाद्या थरारक सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात शोभेल असा प्रकार घडला असून, एका भामट्याने अत्यंत चलाखीने व फिल्मी स्टाईलने ६७ वर्षीय वृद्ध महिलेला दिवसाढवळ्या लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मदतीचे सोंग दाखवून, गोड बोलून आणि विश्वास संपादन करून शेतात काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवले. या घटनेमुळे संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास करंबेळे धावडेवाडी मार्गालगत हा थरार घडला सरिता पांडुरंग वाजे (वय ६७, रा. वांझोळे बुद्रुक, गवळीवाडी) या आपल्या म्हशी चरवत असताना शेतातील चारा काढण्याच्या कामात व्यस्त होत्या. सकाळची वेळ आणि आजूबाजूला फारशी वर्दळ नसलेली निर्मनुष्य परिस्थिती असल्याचा नेमका फायदा घेत एक अनोळखी व्‍यक्‍ती त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचली. अत्यंत धूर्तपणे त्याने महिलेकडे विळा मागितला आणि भेंडीचे दोर काढायचे असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला.

वृद्ध महिलेनेही विश्वासाने त्याला विळा हातात दिला. त्यानंतर तो भेंड काढण्याचे काम करू लागला. त्याच्या मनात वेगळाच कट शिजत असल्याची पुसटशी कल्पनाही त्या वृद्ध महिलेला आली नाही. मात्र, याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्या चोराने आपल्या मनात शिजलेल्‍या डावाचा अंतिम अंक अगदी चोखपणे बजावला. जशी योग्य संधी मिळाली तसा त्याने थेट महिलेच्या गळ्यातील सोन्यावर झडप घातली व तब्बल १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि काही अंतरावर उभ्‍या केलेल्या दुचाकीवर स्वार होऊन त्‍याने धूम ठोकली.

काही कळण्याच्या आतच चोरटा घटनास्थळावरून गायब झाल्यामुळे हतबल झालेल्या त्या आजीबाईंना मोठा मानसिक धक्का बसला. यामुळे परिसरातील नागरिकही अवाक्‌ झाले आहेत. याप्रकरणी देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे करत आहेत.

पोलिसांसमोर चोराला शोधून काढण्याचे आव्हान

दिवसाढवळ्या अशा पद्धतीने गुन्हे करून दुचाकीवरून पसार होणाऱ्या या सराईत चोराचा पोलिस यंत्रणा कधी छडा लावणार आणि लाखाच्या मंगळसूत्रावर डल्ला मारणारा हा भामटा खाकीच्या जाळ्यात कधी जेरबंद होणार, याकडे आता संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचे डोळे लागले असून पोलिस प्रशासनासमोर या चोराला हुडकून काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.