रत्नागिरी : मार्लेश्वर यात्रोत्सवाची आंगवली येथे घरभरणीने उत्साहात सांगता

रत्नागिरी : मार्लेश्वर यात्रोत्सवाची आंगवली येथे घरभरणीने उत्साहात सांगता

Published on

साडवली; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू श्री देव मार्लेश्वराच्या वार्षिक यात्रोत्सवाची आंगवली येथील श्री मार्लेश्वर मंदिर (मठ) येथे घरभरणीने गुरूवारी मोठ्या उत्साहात सांगता झाली.

संंगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहरापासून सुमारे १८ किमी अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कडेकपारीत निसर्गरम्य ठिकाणी एका गुहेमध्ये स्वयंभू श्री देव मार्लेश्वर देवस्थान वसले आहे. मार्लेश्वराचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दरदिवशी हजारो भाविक मार्लेश्वर तीर्थक्षेत्री येत असतात. तर येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. राज्य शासनाने मार्लेश्वर तीर्थक्षेत्र 'क' दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषीत केले आहे. मार्लेश्वराचा वार्षिक यात्रोत्सव दरवर्षी मकरसंक्रांतीला साजरा होत असतो. यावर्षी हा वार्षिक यात्रोत्सव दि. १२ ते १८ जानेवारी या कालावधीत साजरा झाला.

यामध्ये दि. १२ रोजी आंगवली मठात मार्लेश्वर देवाचा मांडव घालणे, दि. १३ रोजी आंगवली मठात देवाला हळद लावणे व घाणा भरणे, दि. १४ रोजी सायंकाळी मठात यात्रा, दिंड्या, कावड, पालख्यांचे आगमन, कल्याणपुर्व विधी व रात्री १२ वा. मार्लेश्वर पालखीचे शिखराकडे प्रयाण, दि. १५ रोजी. श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरिजादेवी यांचा मार्लेश्वर शिखर येथे विवाहसोहळा, दि. १६ रोजी. मारळ येथे मार्लेश्वराची वार्षिक यात्रा, दि. १७ रोजी आंगवली गावात मार्लेश्वर पालखीचे घरोघरी दर्शन व दि. १८ रोजी आंगवली मठात घरभरणीने मार्लेश्वर यात्रोत्सवाची सांगता झाली. दरम्यान, मार्लेश्वराच्या वार्षिक यात्रोत्सव काळात देवरूख आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या. तर यात्रोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मार्लेश्वर तीर्थक्षेत्री देवरूख पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच यात्रोत्सव काळात आरोग्य विभाग व महावितरणनेदेखील आपली कामगिरी चोखपणे पार पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news