

दापोली : दापोली मतदारसंघात उद्धव ठाकरे हे नवी खेळी खेळण्याच्या तयारीत दिसत आहेत. मतदारसंघात थेट कुणबी उमेदवार उतरविणार असून नुकतेच शिंदेंच्या सेनेतून ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केलेल्या सहदेव बेटकर यांना संधी दिली जाईल अशी चर्चा आहे. याआधी रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी समाजाचे पाच आमदार होते. त्या नंतर जिल्ह्यात कुणबी समाजाचे नेतृत्व राहिले नाही. त्यामुळे दापोलीत ठाकरे सेनेकडून कुणबी समाज्याला संधी दिली जाईल असे चित्र आहे.
सहदेव बेटकर हे मुंबईतील उद्योजक असून शिवसेनेतून ते राजकारणात सक्रिय झाले आहेत. 2017 मध्ये संगमेश्वर-कडवई जिल्हा परिषदेवर ते विजयी झाले. त्यांना शिक्षण व अर्थ सभापतिपद मिळाले होते. याबरोबरच त्यांनी गुहागरमधून आमदारकी लढविली.त्यावेळी सेनेने तिकीट नाकारल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले. या मतदारसंघात कुणबी समाज 60-65 टक्के आहे. सहदेव बेटकर हे आपल्या समाजाच्या याच मताच्या संख्येवर लक्ष ठेऊन निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत त्यांनी 52 हजार मते मिळवत जोरदार टक्कर दिली होती. त्यामुळे आगामी काळात दापोली मतदार संघात तोडीसतोड उमेदवार म्हणून पक्ष त्यांना उमेदवार म्हणून उतरविल असे दिसत आहे.
दापोली मतदारसंघ हा कुणबी उमेदवारास अनुकूल मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघात कुणबी समाजाने कायम कुणबी उमेदवारास झुकते माप दिले आहे. अनंत गीते यांना कुणबी समाजाने पाच वेळा खासदार म्हणून संधी दिली. त्यामुळे मंत्री पदापर्यंत त्यांना बहुमान मिळाला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत गीते यांचा पराभव होऊनही 8 हजार मतांचे लीड होते. त्यामुळे पुन्हा एकदा दापोली मतदारसंघात कुणबी समाजाचे नेतृत्व करणारा कुणबी चेहरा दिसेल असे एकंदरीत ठाकरेंच्या पक्षाच्या हालचालीवरून दिसत आहे, तर दापोलीत ठाकरेंची सेना देखील या नव्या पर्यायाला अनुकूल दिसत आहे.