

चिपळूण : तालुक्यातील टेरव येथे मोबाईल टॉवरच्या उभारणीच्या कामासाठी महावितरणच्या विद्युत वाहिनीवरून थेट आकडा टाकून अनधिकृत वीजजोडणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी (दि. १४ ऑक्टोबर) सकाळी १०.५० च्या सुमारास महावितरणच्या चिपळूण विभागीय कार्यालयातील भरारी पथकाने पाहणी केली असता हा प्रकार निदर्शनास आला.
याप्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून दंडाची रक्कम न भरल्यास भारतीय विद्युत कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात टेरव येथे कार्यरत असलेले वायरमन यांच्याविरोधातही ग्रामस्थांनी तक्रार दिली आहे.
टेरव येथील पिकअप शेडजवळ मोबाईल कंपनीच्या टॉवर उभारणीचे काम सुरू होते. महावितरणच्या भरारी पथकाने सकाळी १०.५० वा. घटनास्थळी पाहणी केली असता टेरव येथील गट क्र. १२५/३ मध्ये संतोष विश्राम म्हालीम यांच्या जागेत हे काम सुरू असल्याचे आढळले.टॉवरच्या ठिकाणी सिंगल फेज वेल्डिंग मशीनच्या सहाय्याने वेल्डिंगचे काम सुरू होते. लहान हँड ग्राइंडरही सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी संबंधित ठिकाणी महावितरणचे विद्युत मीटर आढळून आले नाहीत. त्यानंतर अधिक तपासणी केली असता टेरव पिकअप डीपीपासून असलेल्या नवव्या विद्युत खांबावरील सर्व्हिस पोलवरून थेट आकडा टाकून वीजजोडणी केल्याचे आढळले. भरारी पथकाने केलेल्या चौकशीत ही अनधिकृत वीजजोडणी १३ ऑक्टोबर रोजी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार महावितरणकडून संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
घटनेचा भरारी पथकाने पंचनामा केला आहे. भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार दंडात्मक रक्कम न भरल्यास संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
या प्रकरणात टेरव येथे कार्यरत असलेले वायरमन यांच्याविरोधातही ग्रामस्थांनी महावितरणकडे तक्रार दाखल केली. १३ रोजी ग्रामस्थांनी संबंधिताकडे या वीजजोडणीबाबत विचारणा केली असता महावितरणकडून तात्पुरते मीटर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा ग्रामस्थांनी केला, मात्र, दुसर्या दिवशी भरारी पथकाच्या पाहणीदरम्यान घटनास्थळी कोणतेही विद्युत मीटर आढळले नसल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर वायरमन यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सविता कदम यांनी निवेदनाद्वारे महावितरणकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता महावितरणकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे. महावितरणच्या भरारी पथकाचे प्रमुख तथा अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिलकुमार डोंगरे, सहा. अभियंता राजेंद्र रासकर, प्रवीण फाळके व अक्षय जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.