Ratnagiri Rain : रत्‍नागिरी तालुक्‍याला पावसाने झोडपले

गावखडीत दोन मुले जखमी; करबुडे व जाकादेवी पंचक्रोशीत मोठा फटका
Ratnagiri Rain Update
मंडणगड : दाहगाव येथे मुख्य मार्गावर झाड कोसळून वाहतूक ठप्प, तर काही गावांमध्ये घरावरील पत्रे उडून नुकसान झाले.
Published on
Updated on

रत्‍नागिरी : वादळी वार्‍यासह आलेल्‍या पावसाने रत्‍नागिरी तालुक्‍याला चांगलेच झोडपून काढले. विशेषत: उत्तर रत्‍नागिरी तालुक्‍यातील करबुडे, लाजुळ, जाकादेवी, खालगाव, उक्षी या गावांमध्‍ये मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळली, घरांची छपरे उडाली आहेत, महावितरणचेही मोठे नुकसान झाले, वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. गावखडी येथे घरावर माड कोसळून दोन मुले जखमी झाली आहेत.

शनिवारी सायंकाळी ४ च्‍या सुमारास तालुक्‍यामध्‍ये वादळी वार्‍यासह पाऊस कोसळला. सुरुवातीला धुळीचे वादळ निर्माण झाले, सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे हे वादळ घोंगावत होते. त्‍यानंतर पावसाने वार्‍यासह झोडपून काढले.

तालुक्‍यातील उत्तर भागात विशेषत: करबुडे, लाजुळ, जाकादेवी, खालगाव, उक्षी, नरबे, परचुरी या भागाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. झाडे कोसळल्‍याने रस्‍ते बंद झाले. जाकादेवी शाळा क्र. ३ चे नुकसान झाले आहे. जाकादेवी येथील रघुनाथ गोताड यांच्‍या भात गिरणीचे छप्‍पर वार्‍यामुळे उडून मोठे नुकसान झाले आहे. खालगाव नं. 2 जि.प. शाळेचेही नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, जि.प. सदस्‍य व शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्‍हाप, पंचायत समिती सदस्‍या नेहा गावणकर, शिवसेना विभाग संघटक मिलींद खानविलकर यांनी घटनास्‍थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची माहिती पालकमंत्री सामंत यांनी मिळताच त्यांनी तातडीने ग्रामस्‍थांना मदतीचा हात देण्‍याच्‍या सूचना पंचायत समिती सभापती पांचाळ व तालुकाप्रमुख बाबू म्‍हाप यांना दिल्‍या आहेत.

शहरानजीकच्‍या कुवारबाव परिसरालाही फटका बसला. मोठ्याप्रमाणात माती खाली आल्‍याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. शहरामध्‍ये शनिवारी आठवडा बाजार होता. त्‍यामुळे विक्रेते आणि खरेदीदारांचीही त्रेधातिरीपीट उडाली. या वादळीवार्‍याचा व पावसाने संपूर्ण तालुक्‍याला फटका बसला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news